‘बायकोने काळी जादू केली, 6 लाखांचे कबतूर घ्या, मुलगा वाचेल’ पुण्यातील धक्कादायक घटना

क्राईम ताज्या घडामोडी पुणे

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात (Pune) अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी धक्कादायक घटना घडली आहे. मुलावर कुणी तरी करणी केली असून ती उतरवण्यासाठी तब्बल 6 लाख रुपयांचे कबूतर विकत घेण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. अबिझर जुझर फतेपूरवाला (वय 36) हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. अबिझर यांचा भाऊ हुझेफा यांचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. पण मुल होत नसल्यामुळे त्याने सर्व सहमतीने घटस्फोट घेतला होता.  त्यानंतर काही दिवसांनी त्याची अचानक तब्येत खालावली होती. सर्व रुग्णालयात उपचार केल्यानंतरही त्याच्या तब्येतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्याच्या आईने हकिमउद्दीन मालेगाववाला यांना मुलाच्या प्रकृतीबद्दल सांगितले. त्यांच्या ओळखीतला आरोपी कुतुबुद्दीन नजमी हा अबिझर यांच्या घरी आला.

हुझेफा यांची तपासणी केल्यानंतर त्याच्या पत्नीने काळी जादू केली असल्याचे नजमी याने सांगितले. एवढंच नाहीतर ‘अबिझर कुटुंबीयांनी चांगले काम केले म्हणून त्याचा मृत्यू ओढवला नाही, अन्यथा त्याला दिवाळीतच मृत्यू झाला असता, आता ही तो डेंजर झोनमध्ये असून त्याचा कधीही मृत्यू होऊ शकतो’, अशी बतावणी नजमी याने केली होती.

यावर तोडगा म्हणून नजमीने मुंबईत एक विशेष जातीचे कबूतर आहे. ते अत्यंत महाग असून सर्व काळी जादू ते नष्ट करतो, ते मागवावे लागेल असे सांगितले. पण, अबिझर यांच्या कुटुंबीयांनी आधी त्यावर विश्वास दाखवला नाही. पण, जेव्हा त्याच्या घरी चर्चा करण्यासाठी गेले असता त्याने ते कबुतर मागवून घेतले होते. त्याचे पैसेही त्याने परत करण्यास नकार दिला. यासाठी त्याने अबिझर यांच्याकडून तब्बल

6 लाख रुपये आधीच उकळले होते.

आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर अबिझर यांनी उर्वरीत रक्कम मागण्यासाठी नजमी याच्याकडे तगादा लावला. पण, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर या प्रकरणी अबिझर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात नजमीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून नजमीविरोधात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा पोलिसांनी आरोपी नजमीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *