सोलापुरात कांद्याचे दर घसरले, बाजापेठांमध्ये तुर्की आणि इजिप्तचा कांदा दाखल

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दिवाळीनंतर राज्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र मागील काही दिवसांपासून दररोज कांद्याच्या दरात घसरण होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे स्थानिक कांद्याच्या दरात घसरण होत आहे तर दुसरीकडे सोलापूरच्या बाजारात तुर्की आणि इजिप्तचा कांदा देखील दाखल झाला आहे.

सोलापुरात मागील महिन्याभरात जवळपास तीन हजारांनी कांद्याचे दर घसरले आहेत. आज सोलापुरात चांगल्या दर्जाच्या कांद्याला जास्तीत जास्त 2600 रुपये प्रति क्विंटल भाव होता. सातत्याने कांद्याच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे.

सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील इजिप्तवरुन आयात करण्यात आलेला जवळपास 10 टन कांदा बाजारात आला. स्थानिक कांद्याला उग्र वास आणि झणझणीत, तिखट चव असते. मात्र इजिप्तवरुन आयात करण्यात आलेल्या या कांद्याला तशी चव नाही. इजिप्तच्या कांद्याला काकडीप्रमाणे सपक चव आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठात या कांद्याला जास्त मागणी नाही. त्यामुळे केवळ 1500 ते 1700 रुपये इतकाच भाव सोलापुरातील बाजारपेठात या कांद्याला मिळाला. मात्र या कांद्यामुळे बाजारपेठात कांद्याची आवक जास्त दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक कांद्याच्या दरात देखील घसरण होत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *