‘राष्ट्रवादी सत्तेचा धर्म पाळत नाही’, काँग्रेस-शिवसेना नेत्यांची उघड नाराजी

महाराष्ट्र

बीड : राज्यात महाविकासआघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्षांमधल्या कुरबुरी समोर येत आहेत. सत्तेच्या राजकारणात शिवसेना आणि काँग्रेसला योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात आघाडीत अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचं दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये महाविकासआघाडीत बिघाडीचं चित्र पाहायला मिळत आहे.सत्तेच्या राजकारणात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दादासाहेब मुंडे यांनी केला आहे. पालकमंत्री असलेल्या पक्षाला महामंडळात 60 टक्के वाटा, तर इतर दोन पक्षांना 20-20 टक्के वाटा, हा फॉर्म्युला ठरलेला असतानादेखील बीडमध्ये असं काही होत नसल्याची टीका शिवसेना नेते दिलीप गोरे (Dilip Gore) यांनी केला आहे. स्थानिक आमदार आपल्याच पत्रावळीवर सगळं काही ओढत आहे, महाविकासआघाडीचा धर्मा पाळला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.2019 साली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी एकत्र येऊन महाविकासआघाडी सरकार बनवलं, त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं. यानंतर अनेकवेळा काँग्रेस नेत्यांकडून निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची नाराजी आणि तक्रारही बोलून दाखवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *