200च्या नोटेपासून बनवल्या 2000च्या हुबेहूब नोटा; पण याठिकाणी टॅलेंटनं खाल्ला मार

0
64

कोल्हापूर: दोनशे रुपयांच्या खऱ्याखुऱ्या नोटेपासून 2 हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोटा बनवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. मागील बरेच महिने प्रयोग केल्यानंतर आरोपीनं दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेपासून 2 हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोट तयार करण्यात आली होती. आरोपीनं आपल्या मित्राच्या माध्यमातून या नोटा एका राष्ट्रीयकृत बँकेत भरण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीचं बिंग फुटलं आहे. संबंधित बनावट नोटांचा सिरीअल क्रमांक एकच असल्यानं आरोपीचं गुपित समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.उत्तम पोवार आणि त्याचा मित्र अनिकेत असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संशयित आरोपी उत्तम पोवार यानं या नोटा बनवल्या होत्या. आरोपी पोवार हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथील रहिवासी आहे. त्याचे वडील शेतकरी असून त्यांच्या घरी थोडी शेती आहे. तर आरोपीच इयत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण झालं आहे. पण आरोपीनं सर्च चॅनेलवरून प्रशिक्षण घेत, दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेपासून दोन हजार रुपयांची बनावट नोट तयार करण्याचं कौशल्य आत्मसात केलं आहे.

आरोपीनं दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटेचा वापर करत दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून आरोपी पोवार आपल्या घराच्या पोटमळ्यावर संगणक आणि प्रिंटरद्वारे असे प्रयोग करत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर तो या प्रयोगात यशस्वी झाला होता. यासाठी त्यानं दोन हजार रुपयांच्या 17 नोटा तयार केल्या होत्या. यानंतर आरोपीनं आपल्या एका मित्राकडे हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी दिली. संबंधित मित्रांच्या वडिलांचा जेसीबीचा व्यवसाय होता. त्यामुळे ते नेहमी बँकेत मोठ्या रकमेचा भरणा करतात ही बाब आरोपीला माहीत होती.

याचाच फायदा घेतं आरोपीनं आपल्या मित्राकडे 2000 रुपयांच्या 17 बनावट नोटा बँकेत भरणा करण्यासाठी दिल्या. मित्रानं 1 लाख रुपयांच्या खऱ्या आणि 34 हजार रुपयांच्या खोट्या नोटा राष्ट्रीयकृत बँकेत जमा केल्या. बँकेतील कर्मचारी देखील सुरुवातीला फसला होता. पण संबंधित नोटा एकाच सिरीअल नंबरच्या असल्याचं बँक कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं. यामुळे आरोपीचं बिंग फुटलं आहे. केवळ बनावट नोंटाचा सिरिअल क्रमांक एकच असल्यानं आरोपीचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी बँक कर्मचाऱ्यांनं याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here