मुंबई : कोरोनाच्या संसर्गामुळे महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा ही 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांकडे अभ्यास आणि तयारी करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक असणार आहे.
26 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी MPSCची पूर्व परीक्षा आता 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 1 नोव्हेंबर रोजी नियोजित वेळेत घेण्यात येणार आहे.राज्य लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही.
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, हॅण्ड सॅनिटाइझ करणं गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी आयोजनातील कर्मचारी आणि आयोगाकडून शक्य तेवढ्या सर्व उपाययोजना कऱण्यात येणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असणार आहे.