मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: दुकानांच्या वेळा 8 वाजेपर्यंत

0
65

सांगली: कोरोना आणि महापूर  या दोन्ही प्रश्नांवर जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यात दुकानांना रात्री 8 वाजेपर्यंत  परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून व्यापाऱ्यांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यातील जनतेला लॉकडाऊनमधून दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करत असून राज्यातील दुकानं रात्री8 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी आहे, त्या भागात हा निर्णय लागू होणार आहे. ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे मात्र निर्बंध कायम राहतील, असं त्यांनी सांगितलं.

अनियंत्रित विकासामुळे पूर

राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनियंत्रित विकास झाला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. जिथं भेटी दिल्या आणि जिथं दिल्या नाही, त्या सर्व भागांना सारखीच मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नदीच्या जवळ भिंती बांधण्याच्या आपल्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं सांगताना ते माझं नव्हे, तर तज्ज्ञांचं मत असल्याचं आपण बोललो होतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कामाच्या वेळात बदल करा

खासगी कार्यालयांनी कामाच्या वेळात बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या, एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

धमक्यांना घाबरत नाही

दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत, तर कायदा मोडून दुकानं सुरु ठेऊ, अशी भूमिका पुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी घेतली होती. त्यावर आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नसून जनतेच्या हिताची आपल्याला अधिक काळजी असल्याचं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना कमी आहे, अशा जिल्ह्यांतील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरु ठेवायला परवानगी मिळणार असल्याचं ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here