मुंबईत काँग्रेस आणि भाजपच्या वादात मनसेने घेतली वेगळीच भूमिका

ताज्या घडामोडी मुंबई

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दिली. अस्लम शेख यांच्या या मागणीनंतर आता राजकारण तापलं असून भाजपने खळबळजनक आरोप केला आहे.अस्लम शेख यांची मागणी वादात सापडल्यानंतर स्वतः मुंबई काँग्रेसनेही ही मागणी शेख यांची वैयक्तिक प्रतिक्रिया असल्याचं म्हटलं आहे. शिवाय मुंबईमध्ये आधीच मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर अशा तीनही भागांची जबाबदारी तीन अतिरिक्त आयुक्तांवर सोपवलेली असताना दुसऱ्या आयुक्तांची गरज नाही. मुंबई महापालिकेच्या कायद्यातच मुळात अशा पद्धतीची तरतूद नाही, असं प्रतिपादन काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलं आहे.अस्लम शेख यांची मागणी म्हणजे मुंबईचे दोन तुकडे करण्याचा प्रकार असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनीही मुंबई महापालिकेच्या कायद्याबद्दल माहिती देत असताना अशी कुठलीही तरतूद कायद्यात नाही. तेव्हा हा केवळ मुंबई तोडण्याचा डाव आहे आणि शिवसेनेची प्रतिक्रिया ही केवळ धूळफेक करणारी आहे, असा हल्लाबोल शेलार यांनी केला.दुसरीकडे, मनसेनं मात्र वेगळीच भूमिका घेत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबईला दोन नाही तर चार आयुक्तांची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे. मुंबई महापालिकेचा कारभार हा खूप मोठा असून कामाचे विभाजन झाले तर लोकांचे काम लवकर होईल. त्यासाठी 2 नाही तर चार आयुक्तांची गरज असल्याचं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुका या अवघ्या एक वर्षावर असताना अशा पद्धतीच्या मागण्या होऊ लागल्याने राज्याच्या राजधानीतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *