मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

ताज्या घडामोडी सोलापूर

मोहोळ ;
मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायती च्या निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसला नसतानाच मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाकडून प्रशासन स्तरावर निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानुसार ८ मे ला पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपण्यापूर्वी १ फेब्रुवारी पासून ते ९ मार्च दरम्यान प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगरसेवकांसाठी १० फेब्रुवारीला आरक्षण सोडत काढली जाणार आहेत. दरम्यान इच्छुकांनी मात्र प्रभाग आरक्षण सोयीचे पडावे यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
मोहोळच्या बहुचर्चित नगरपरिषदेच्या दुसऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला असून विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा कार्यकाल आठ मे रोजी मुदत संपुष्टात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून मोहोळ नगर परिषद निवडणुकीचा नगर परिषद मधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये १ फेब्रुवारी रोजी मोहोळ च्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव यामध्ये प्रभागांची संख्या, प्रभाग निहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासह मुख्याधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.  ४ फेब्रुवारीपर्यंत या प्रारूप प्रस्तावाला जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीसाठी ८ फेब्रुवारीला नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. १० फेब्रुवारीला मुख्याधिकारी कडून नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे.
१५ ते २२ फेब्रुवारी दरम्यान प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे, सदस्य पदाच्या आरक्षणावर  हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी प्राप्त हरकती व सूचनांवर  सुनावणी घेतली जाणार आहे. एक मार्च रोजी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय नगरपरिषद प्रशासन यांच्याकडे पाठवला जाणार आहे. तर ५ मार्चपर्यंत विभागीय आयुक्तांकडून प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीला मान्यता दिली जाणार आहे. ९  मार्च ला अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\-
भावी नगरसेवकांची होणार धावपळ
वॉर्डनिहाय प्रभाग रचनेमध्ये आपल्या सोयीनुसार मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी भावी नगरसेवकांची जोरदार फिल्डिंग असणार असून यासाठी ची धावपळ आतापासूनच सुरू केली असल्याचे चित्र मोहोळ शहरात दिसत आहे. यासह आपल्या सोयीचे आरक्षण कोणत्या वार्डात पडेल, ह्या आशेने सध्याच्या वॉर्डासह शेजारील वॉर्डांमध्ये ही आपला संपर्क वाढवून ठेवला आहे. इच्छुकांची वाढलेली संख्या पाहता सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *