मुद्यावरुन थेट गुद्यावर, विरोधकांकडून सरपंचाला बेदम मारहाण,मोहोळ तालुक्यातल्या सय्यद वरवडेतील घटना

ताज्या घडामोडी सोलापूर

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या एका नवनिर्वाचित सरपंचाला सर्वसाधारण सभा घेऊ नकोस असे म्हणत मारहारण केल्याची घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाल्मिकी जालिंदर निळे असं या मारहाण झालेल्या सरपंचाचे नाव आहे.

या मारहाणीविरोधात मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्यांविरोधात कलम 353 नुसार शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत पीडित सरपंचाच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली असून यात एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 फेब्रुवारी रोजी सय्यद वरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये वाल्मिकी निळे यांची सरपंचपदीतर उपसरपंचपदी पमाबाई कोरे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे विरोधी गटातील नेते नाराज होते. त्यानंतर आज 10 मार्च रोजी सय्यद वरवडे गावची पहिलीच सर्वसाधरण सभा घेण्यासाठी सरपंच वाल्मिकी निळे हे ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यावेळी गावातील विरोधी गटाच्या नेत्यांनी त्यांना ‘आज सभा घ्यायची नाही’ असे म्हणत आज जाण्यास विरोध केला. त्यावेळी सरपंच निळे यांनी मात्र त्यांना विनंती केली की, गावच्या विकासासाठी मला सभा घेऊ द्या. मात्र विरोधी गटाच्या लोकांनी त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव करत कार्यालयातून बाहेर ओढले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सरपंच वाल्मिकी निळे हे जखमी झाले.

सोडवायला गेलेले सरपंचपुत्र शिवराज निळे यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी राजेंद्र औदुंबर विरपे, अंकुश उर्फ भाऊ मारुती कदम, देविदास भिवा कदम, सोमनाथ विलास विरपे, बाळू भिवा कदम या पाच जणांच्या विरोधात सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर परस्पर विरोधी दाखल झालेल्या तक्रारीमध्ये सदरील भांडणे चालू असताना भांडणे सोडवायला गेलेले देविदास भिवा कदम व संजय सुभाष कोरे यांनाही मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी सरपंच वाल्मिकी जालिंदर निळे, शिवराज वाल्मीकी निळे, करीम पिरसाब पाटील, दत्तात्रय महादेव गुजर या 4 जणांवर देविदास कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहोळ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार बी. बी. शेलार करीत आहेत. मात्र, अशा पद्धतीने सरपंचालाच मारहाण करण्यात आलेल्या घटनेमुळे लोकशाहीचे धिंडवडे निघत असाल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *