नागरिकांमध्ये भीती…,बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावला पिंजरा…
मोहोळ [ तालुका प्रतिनिधी] मोहोळ तालुक्यातील भोयरे गावच्या शिवारात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी रात्री बिबट्याने येथील एका शेतकऱ्याच्या जर्सी गाईवर हल्ला करून तिची शिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्याने आरडा ओरड केल्याने बिबट्याला शिकारी शिवाय काढता पाय घ्यावा लागला. मात्र या हल्ल्यात सदरची गाय गंभीर जखमी झाली. दरम्यान वन विभागाने सोमवारी सायंकाळी या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून मोहोळ शहर व सीना नदी काठच्या काही गावांमध्ये बिबट्याचा वावर आहे. या बिबट्याने आपली भूक भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला सुरू केला आहे. आतापर्यंत या बिबट्याने मोहोळ येथील गुरव वस्तीवर एका वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्याने खरकटणे येथील एक घोड्याचे शिंगरू आणि मोहोळ शहरातील घागरे वस्ती येथील एका शेळीचा फडशा पाडला आहे. तर भोयरे येथील एका शेळी वर हल्ला करुन जखमी केले आहे. त्यानंतर रविवारी रात्री भोयरे गावातील संतोष पवार या शेतकऱ्याच्या एका जर्सी गाय वर हल्ला करून शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता जर्सी गाई आकाराने मोठी असल्याने व वेळीच शेतकर्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याचा बेत फसला आहे. घटनेची माहिती मिळताच सोमवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.
बिबट्या हा मार्जार कुळातील एक जंगली हिंस्र पशू आहे. आपल्या भुकेसाठी तो कोणत्याही प्राण्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे सहाजिकच नागरिक बिबट्याला घाबरतात. या बिबट्याने सीना नदी काठच्या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली जगत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या बिबट्याला पकडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मात्र मोहोळ तालुका वन विभाग प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तालुकावासी यातून संताप व्यक्त केला जात आहे. वनविभाग प्रशासनाने या बिबट्याला वेळीच पकडले नाही तर त्याच्याकडून लहान मुले अथवा मोठ्या माणसावर देखील हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान बिबट्या कडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे मोहोळ तालुका वन विभाग प्रशासनाने भोयरे परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती मोहोळचे वनरक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
बिबट्या कडून मानवावर हल्ले होण्याच्या घटना फारच दुर्मिळ आहे. मात्र या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकातून भीतीपोटी तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे भोयरे गावच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सोमवारी सायंकाळी पिंजरा लावण्यात आला आहे. लवकरच बिबट्या पकडला जाण्याची शक्यता आहे.
सचिन कांबळे
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\
बिबट्याला पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात एक शेळी ठेवली जाते. त्या पिंजऱ्यालाच संलग्न दुसरा मोठा पिंजरा असतो. बिबट्याने पिंजऱ्यातील शेळीवर हल्ला केला तरी त्याला त्याची शिकार करता येत नाही. कारण त्याचा मोठ्या पिंजरा मध्ये प्रवेश होताच त्याचा पिंजरातील फळीवर पाय पडतो. त्यामुळे पिंजरा बंद होऊन बिबट्या त्यात फसतो. त्यामुळे भोर येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसतो किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.