‘मुस्लिम धर्म स्वीकारताच बॅटिंग सुधारली’, दिग्गज क्रिकेटपटूचा वादग्रस्त दावा

ताज्या घडामोडी देशविदेश

मुंबई : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ याने इस्लाम कबूल केल्यानंतर आपली बॅटिंग सुधारल्याचा दावा केला आहे. 2005 साली त्याने ख्रिश्चन धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला होता. यानंतर 2006 साली त्याने उत्कृष्ट बॅटिंग केली. याची सुरूवात भारताविरुद्धच झाली. युसूफने भारताविरुद्ध 199 बॉलमध्ये 173 रन केले. यानंतर इंग्लंड दौऱ्यातही त्याने कमाल केली. 2006 साली त्याने 99.33 च्या सरासरीने 1,788 रन केले. याचसोबत त्याने एकाच वर्षात एवढे रन करण्याचं व्हिव्हियन रिचर्ड्स यांचं रेकॉर्डही युसूफने मोडलं.

2006 साली युसूफने 9 शतकं केली. एका वर्षात सर्वाधिक शतकं करण्याचा हा विक्रम आहे. याचसोबत त्याने लागोपाठ 6 शतकं ठोकत सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली होती.

मोहम्मद युसूफ विस्डनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला, ‘मला कोणीही इस्लाम स्वीकारायला दबाव टाकला नाही. मी सईद अन्वरच्या खूप जवळ होतो. आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो. सईदसोबत मी खूप वेळ घालवला. मी त्याच्याच घरी राहायचो, तेव्हा त्याच्या कुटुंबातली शिस्त बघितली. त्याचं आयुष्य मला खूप शांत वाटलं. मुलीच्या निधनानंतर सईद अन्वर आणखी धार्मिक झाला. त्याला पाहून मलाही इस्लाम कबूल करण्याची प्रेरणा मिळाली.’

‘इस्लाम कबूल करताच अल्लाहची माझ्यावर कृपा झाली. मला आतून शांत वाटायला लागलं. 2006 साली मी ट्रेनिंग आणि सरावात काहीही बदल केले नाहीत. मी दाढी वाढवली आणि मला मनातून शांतता मिळाली. 2006 सालची माझी कामगिरी अल्लाहने दिलेला तोहफा होता, असं मला नेहमीच वाटतं,’ अशी प्रतिक्रिया युसूफने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *