आव्हान दिल्यास सडेतोड उत्तर देऊ, लोंगेवालामध्ये जवानांच्या उपस्थिती पंतप्रधानांचा चीन-पाकला इशारा

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी त्यांची दिवाळी राजस्थानच्या लोंगेवाला येथील जवानांसोबत साजरी केली. त्यांनी भारताच्या शूर जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “तुम्ही भले बर्फाळ प्रदेशात राहा वा वाळवंटी प्रदेशात, माझी दिवाळी तुमच्यासोबतच आल्यानंतरच पूर्ण होते.”

यावेळी पंतप्रधानांनी 1971 साली पाकिस्तानसोबत लढल्या गेलेल्या लोंगेवालाच्या ऐतिहासिक युद्धाची आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, “भारतीय जवानांनी लोंगेवाला इथे इतिहास रचला होता. या लढाईने स्पष्ट केले की भारतीय सैन्यासमोर कोणतीही शक्ती तग धरु शकत नाही.”

ते पुढे म्हणाले की, ‘आजचा भारत समजण्यावर आणि समजावण्यावर भर देतो. आजचा भारत शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता ठेवतो. भारताला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या घरात घुसून मारण्याची क्षमता जवानांकडे आहे.”

पंतप्रधानांनी सैनिकांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, “तुमच्या चेहऱ्यावरचे तेज पाहिले, आनंद पाहिला तर मलाही आनंद होतो.” पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून चीनलाही इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “विस्तारवाद एक मानसिक विकृती आणि अठराव्या शतकातील मागास विचार आहे.”

नाव न घेता चीनवर टीका
पंतप्रधानांनी त्यांच्या संबोधनात चीनचे नाव न घेता टीका केली. त्यांनी म्हटले की, “आज विस्तारवादी धोरण ही जगाची डोकेदुखी बनली आहे. विस्तारवाद एक प्रकारची मानसिक विकृती आहे आणि अठराव्या शतकातील मागास विचार आहे. या विस्तारवादाच्या विरोधात भारत प्रखरपणे आवाज उठवत आहे. “

पंतप्रधान पुढे म्हणाले की, “भारत आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही हे जगाने ओळखले आहे. भारताची ही शक्ती आणि जगभर मिळत असलेली प्रतिष्ठा केवळ लष्कराच्या जवानांच्या पराक्रमामुळेच प्राप्त झाली आहे. भारतीय जवानांनी देशाला सुरक्षित केले आहे म्हणूनच देश आपला विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रखरतेने मांडू शकतो. “

भारतीयांच्या शुभेच्छा घेऊन आलोय
पंतप्रधानांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीलाच सांगितले की, “प्रत्येक भारतीयाची शुभेच्छा आणि त्यांचे प्रेम घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. मी आजच्या दिवशी त्या सर्व माता-भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या त्यागाला नमन करतो ज्यांनी आपल्या घरातील जवानाला भारताच्या सीमांचे रक्षण करायला पाठवले आहे. भारतीय जवानांच्या शौर्याला नमन करताना एक विश्वास देतो की 130 कोटी भारतीय तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. आज प्रत्येक देशवासियाला आपल्या जवानांच्या शौर्यावर अभिमान आहे.”

पंतप्रधान म्हणाले की “जगाचा इतिहास आपल्याला सांगतो की ज्या राष्ट्रात अंतर्गत समस्यांचा मुकाबला करण्याची क्षमता असते तेच राष्ट्र जगाच्या पाठीवर पुढे जाऊ शकते.”

संरक्षण क्षेत्रात ‘व्होकल फॉर लोकल’ चा नारा
पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रात घेण्यात आलेल्या ताज्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, “अलिकडे आपल्या लष्कराने ठरवले आहे की 100 पेक्षा जास्त संख्येने असलेले संरक्षण साहित्य आणि इतर सामान परदेशातून आयात करायचे नाहीत. लष्कराच्या या निर्णयाचा मी आभारी आहे. लष्कराच्या या निर्णयाने सामान्य भारतीयांनाही ‘लोकल फॉर व्होकल’ साठी प्रेरणा मिळेल. मी देशातील तरुणांना आव्हान करतो की त्यांनी लष्करासाठी आवश्यक साहित्य बनवण्यास प्राधान्य द्यावे. संरक्षणाच्या क्षेत्रात तरुणांनी नव्या स्टार्ट अपच्या माध्यमातून देशाला आत्मनिर्भर करावे.”

2014 मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांची प्रत्येक वर्षाची दिवाळी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत साजरी करतात. याआधी त्यांनी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या तळावर जाऊन दिवाळी साजरी केली होती.

भारत-पाकिस्तान युद्धात सीमेवरील महत्वाची चौकी म्हणजे लोंगेवाला

– 1965 नंतर पुन्हा 1971 च्या युद्धात पाकिस्तानने इथे हल्ला केला, इथेच भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ करत पाकला हरवून या सीमेचं रक्षण केलं होतं

– पाकिस्तानला लागून असलेल्या राजस्थानच्या जैसलमेरपासून 90 किलोमीटर अंतरावर ही लोंगेवाला चौकी. त्यावेळी 23 पंजाब रेजिमेंटचे जवान या सीमेवर तैनात होते

– 1971 साली भारताच्या फक्त 120 वीर जवानांनी पाकिस्तानच्या 2 हजार पेक्षा जास्त जवानांच्या तुकडीला आणि जवळपास 65 रणगाड्यांच्या आक्रमणाला कडवी झुंज देत इथे रात्रभर रोखून धरलं होतं.

– भल्या पहाटे भारताच्या हवाई दलाने निर्णायक हल्ला चढवला, हंटर विमानांनी पाकिस्तानी लष्कर आणि रणगाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान करत लोंगेवालाची ही लढाई जिंकली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *