पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 36 लाखांची वाढ, तर गृहमंत्री अमित शाहांची संपत्ती घटली!

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:हून त्यांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची संपत्ती जाहीर केली. या वर्षी 30 जूनपर्यंत पंतप्रधानांची संपत्ती ही 2.85 कोटी रुपये इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 36 लाखांची वाढ झाली आहे. 2019 साली त्यांनी 2.49 कोटी इतकी संपत्ती असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या बँकेतील रक्कमेत वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीतील वाढ झाल्याचे लक्षात येते. त्याचवेळी गृहमंत्री अमित शाहांना शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला असून त्यांची संपत्ती घटली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिहांच्या संपत्तीत कोणताही बदल झाल्याचं दिसत नाही.

पंतप्रधांनावर कोणतेही कर्ज नाही
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संपत्तीचा पूर्ण लेखाजोखा वेबसाईटवर प्रकाशित केला आहे. त्यानुसार त्यांच्या हातात सध्या 31,450 रुपये आहेत. त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये 3,38,000 रुपये शिल्लक आहेत. गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांची एफडी अर्थाच फिक्स डिपॉजिटची रक्कम एक कोटी 60 लाख 28 हजार इतकी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये बचत योजनेअंतर्गत त्यांच्या नावावर 8 लाख 43 हजार रुपये आहेत. एलआयसी जीवन विमा योजनेत त्यांनी 1,50,957 रुपये गुंतवले आहेत. त्यांच्याकडे टॅक्स फ्री बॉंड आहेत त्याची किंमत 20,000 रुपये आहे.

नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या संपत्तीत स्थावर संपत्तीचाही समावेश केला आहे. गांधीनगर येथे असलेल्या घरामध्ये त्यांचा 25 टक्के वाटा असल्याचे त्यांनी सांगितलं. त्या घराची सध्याची किंमत ही एक कोटी दहा लाख इतकी आहे. त्यांच्याकडे 45 ग्रॅमच्या तीन अंगठ्या आहेत. त्याची किंमत ही 1,51,875 इतकी आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या संपत्तीत त्यांच्याकडे कोणतीही गाडी नसल्याचे सांगण्यात आले आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर कोणतेही कर्ज नसल्याचे सांगितले आहे.

अमित शाहांच्या संपत्तीत घट
त्याच वेळी त्यांचे सहकारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांच्या बँक खात्यात एक कोटी चार हजार रुपये आहेत. त्यांच्या हाती आता 15,814 रुपये आहेत. त्यांची फिक्स्ड डिपॉजिट ही 2,79,000 इतकी आहे आणि त्यांनी काढलेल्या जीवन विमा आणि पेन्शन योजनेची किंमत ही 13,47,000 इतकी आहे. त्यांना वडिलोपार्जित मिळालेली संपत्ती ही 12 कोटी रुपये इतकी आहे. 31 मार्चपर्यंत त्यांची संपत्ती ही 13 कोटी 5 लाख इतकी आहे. 2019 साली त्यांनी जाहीर केलेली संपत्ती ही 17 कोटी 9 लाख इतकी होती. शेअर बाजारातील घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत घट झाली आहे. विशेष म्हणजे अमित शाहांवर 15 लाख 70 हजारांचे कर्जही आहे.

नरेंद्र मोदींच्या धोरणानुसार संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाने दरवर्षी त्यांची संपत्ती जाहीर करणे अनिवार्य आहे. याबद्दलची सर्व माहिती www.pmindia.gov.in या वेबसाईटवर मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती ही 30 जूनपर्यंतची आहे तर त्यांच्या इतर सहकाऱ्यांची संपत्ती ही 31 मार्च 2020 पर्यंतची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *