MHT CET Results Declared: 41 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 पर्सेंटाईल गुण

ताज्या घडामोडी देशविदेश

पुणे: एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीईटी सेलकडून PCM व PCB गटाच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यात 100 पर्सेंटाइलच्या पध्दतनुसार 41 विद्यार्थ्यांनी 100 गुण प्राप्त करण्यात यश मिळवले आहे. त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांना फिजिक्स-केमेस्ट्री-मॅथ्स (PCM) या गटात तर 19 विद्यार्थ्यांनी फिजिक्स-केमेस्ट्री-बायोलॉजी (PCB) या विषयात 100 गुण मिळाले आहेत. यात मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला.

PCM पर्सेंटाईल गटात पुणे जिल्ह्यातील सानिका गुमास्ते ही राज्यातून प्रथम आली आहे तर PCB पर्सेंटाईल गटात पुण्याचा अनिश जगदाळे राज्यातून प्रथम आला आहे. PCM गटात पुण्याचा सौरभ जोगचा दुसरा क्रमांक आला आहे तर अहमदनगरची वंशिता जैन या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. PCBपालघर जिल्ह्यातील वर्षा कुशवाह हिने दुसरा आणि नांदेड जिल्ह्यातील वेदांत जोशी याने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

PCM गटात 1.74 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांनी पर्सेंटाईल पध्दतीने 100 गुण मिळवले आहेत. त्यापैकी 8 विद्यार्थी हे मुंबई विभागातील आहेत. तर 2.11 लाख विद्यार्थ्यांनी PCB गटातून परीक्षा दिली होती. त्यामध्ये 19 विद्यार्थ्यी 100 गुण प्राप्त करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यापैकी 4 विद्यार्थी हे मुंबई शहरातील आहेत.

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 5 लाख 42 हजार 431 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 86 हजार 604 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 1 लाख 55 हजार 827 विद्यार्थी यंदा परीक्षेला अनुपस्थित राहिले. विद्यार्थ्यांना आपले निकाल mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *