तीन महिलांसह 5 जणांना पोलीस कोठडी
सोलापूर (प्रतिनिधी)
लग्नासाठी मुलगी आहे असे सांगून नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबाकडे पैशाची मागणी करीत 1 लाख 78 हजाराची फसवणुक करून आणखी 1 लाखाची खंडणी मागणाऱ्या 5 जणांना एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद करून मोठा कट उघड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.लालासो सदाशिव पवार (वय 40, रा. मुपो सरताळे, ता. जावळी, जि. सातारा),धनाजी अमृत पाटील (वय 32, रा. मुपो चमकेर, ता.अथणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक),दिपा संतोष जाधव (वय 30, रा. लिमयेवाडी, सोलापूर), पूजा ईश्वर उपाध्ये (रा. लिमयेवाडी, सोलापूर), अन्नु विशाल सिकाटोलू (वय 19, रा. लिमयेवाडी, सोलापूर), सचिन पांडव (रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर), बापुराव ढवळे (रा. सफेपूर, जि. बीड), बिराजदार मावशी, ज्योत्सना, संतोष जाधव (रा. लिमयेवाडी, सोलापूर) असे 10 आरोपींची नावे आहेत. यातील 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अंकुश नामदेव ढमाळ (वय 42, रा. मुपो आसवली, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी त्यांचा मावस भाऊ सचिन चंद्रकांत ढमाळ याला लग्नासाठी मुलगी पाहण्याचे असल्याने सातारा जिल्ह्यातील सरताळे गावातील त्यांचा मावस भाऊ लालासो पवार याला समक्ष भेटून सचिनसाठी मुलगी पाहण्यास सांगितले त्यानंतर दि. 17 फेब्रुवारी रोजी लालासो याने त्याच्याकडील मोबाईलवरून धनाजी अमृत पाटील याला लग्नासाठी मुलगी आहे का अशी विचारणा केली त्यावेळी फोनवरूनच त्याने वधु वर सूचक मंडळाचे काम पाहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या बीड जिल्ह्यात राहणाऱ्या बाबुराव ढवळे याच्याकडे मुलगी आहे का असे विचारल्यावर ढवळे याने सोलापूरमध्ये त्याची मावशी आहे तिच्याकडे लग्नासाठी मुलगी आहे ती पाहण्यास या आणि येताना सोबत रोख दीड लाख रूपये तसेच मंगळसूत्र, पायातील पैंजण, घेवून या मुलगी आवडली तर तिथेच लग्न लावून देवू असे विश्वासाने सांगितले. त्याप्रमाणे दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गावाकडून तवेरा गाडीत सर्वजण सोलापूरला आले. सोलापूरमध्ये आल्यावर एसटी स्टॅन्ड जवळ लाला पवार याने धनाजी पाटील याला फोन केल्यावर त्याने तुम्ही तिथेच थांबा मी येतो असे सांगून काही वेळातच मोटारसायकलवर आणखी एकाला घेवून आला आणि माझ्या मागे या असे म्हणून हैदराबाद रोडवरील चंदन काटा येथे आणले तेथे दोन महिला होत्या त्यातील ज्योत्सना आणि बिराजदार मावशी अशी त्यांनी नावे सांगितले. तेथून एका घरात घेवून गेले असता तिथे आणखी तीन महिला होत्या त्यामध्ये दीपा संतोष जाधव, पूजा भरत दाणेदारीया आणि नवरी मुलगी म्हणून पूजा रवी पवार असे आहेत असे सांगण्यात आले. मुलीला पसंत आहे म्हणाल्यावर आरोपींनी तातडीने लग्नाची तयारी करीत नवरा मुलगा सचिन याला नवरी मुलगी पूजा या एकमेकांना हार घालून मंगळसूत्र, जोडवे, पैंजण घालून लग्न करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी अंकुश ढमाळ याच्याकडे दीड लाख रूपये बोलणे झाल्याप्रमाणे द्या असे सांगितले त्यानुसार त्यांना पैसे देण्यात आले. लग्न झाल्यानंतर मुलीला आणि तिच्या सोबत एक महिला अशा दोघांना सोडून सर्व आरोपीं तिथून निघून गेले. त्यानंतर मुलीला नवरदेव आणि त्याचे परिवाराने आणलेल्या तवेरा गाडीतून त्यांच्या गावाकडे घेवून जात असताना पाकणी येथे नवरी मुलीची मावशी हिने आम्हाला भूक लागली आहे असे सांगून एका हॉटेल जवळ थांबवले तेथे कपडे बदलायचे असे सांगून पळ काढला त्यांना एका हॉटेलच्या मागे लपल्याचे पाहून पकडले तर त्यावेळी नवरी मुलगी आणि तिच्या सोबत असलेली तिची मावशी यांनी 1 लाख रूपये द्या नाहीतर आम्ही पोलीसांकडे तक्रार करतो असे खंडणी मागून दमदाटी केली. त्याचवेळी नवऱ्या मुलाला संशय आल्याने त्याने पोलीसांना बोलावून घेतले ग्रामीण पोलीसांनी नवरी मुलगी आणि तिच्या मावशीला ताब्यात घेवून चौकशी केली असता वरील आरोपींनी मिळून बनावट लग्न लावून पैसे उकळण्याचा प्रकार केला असल्याचे उघड झाले. हा प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने ग्रामीण पोलीसांनी आरोपींना एमआयडीसी पोलीसांच्या हवाली केले. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ राठोड यांना दिला. त्यानुसार निलकंठ राठोड यांनी त्यांच्या पथकाला घेवून वरील 5 आरोपींना अटक केली आणि फसवणुक करून घेतलेले पैसे जप्त करून मोठे रॅकेट उघड केले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ राठोड, खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक बजरंग बाडीवाले, हवालदार ताजोद्दीन शेख, महिला पोलीस नाईक संध्या गायकवाड, महिला पोलीस शिपाई ज्योती पवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. अटक करण्यात आलेल्या 3 महिलांसह 5 जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे तर या गुन्ह्यातील आणखी 5 जण फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.