अरुणाचल प्रदेशातील सीमेवर कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

ताज्या घडामोडी देशविदेश

मालेगाव: अरुणाचल प्रदेशातील देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण आलं आहे. मनोराज सोनवणे असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून ते मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ येथील रहिवासी आहेत.

मनोराज सोनवणे हे भारतीय लष्कारात 21 पॅरा स्पेशल फोर्समध्ये कमांडो म्हणून गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत होते.अरुणाचल प्रदेशातील अति थंड वातावरणात कर्तव्य बजावताना त्यांची प्रकृती बिघडली. नंतर त्यांना कोलकात येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मनोराज यांची प्राणज्योत मालवली. मनोराज यांच्या निधनामुळे चिखलहोळ या मुळगावी शोककळा पसरली आहे.

शेतकरी कुटुंबातील मनोराज सोनवणे यांनी 2005 मध्ये भारतीय लष्कराच्या मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. नंतर 2009 मध्ये 21 पॅरा कमांडोमध्ये त्यांना बढती मिळाली होती.मनोराज यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी जयश्री सोनवणे, मुलगा तुषार (वय-6), मुलगी (वय-3) असा परिवार आहे.

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

मनोराज सोनवणे यांचं पार्थिव कोलकाता येथून विमानानं मुंबई येथे येईल. तेथून मालेगाव तालुक्यातील चिखलहोळ या मूळगावी लष्करी इतमामात अंतसंस्कार करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनानं शहीद जवानाच्या अंतिम निरोपाची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गस्त घालत असताना सीआरपीएफची (CRPF) एक जिप्सी नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत एक जवान शहीद झाला होता. तर तीन जवान जखमी झाले होते.सीआरपीएफचे हे पथक नरसू भागात गस्त घालत होते. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *