मुंबई, : कायद्यानुसार, दोन विवाह केलेल्या पतीच्या मालमत्तेवर पख्त पहिल्या पत्नीलाच अधिकार मिळतो. मात्र, दोन्ही पत्नींच्या मुलांना संपत्तीवर हिस्सा मिळू शकतो, असं मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना व्यक्त केलं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर त्याच्या आर्थिक रकमेवर त्याच्या दोन पत्नींनी दावा केला आहे. यावर कोर्टानं असं मत व्यक्त केलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक उपनिरीक्षक हे महाराष्ट्र रेल्वे पोलीस दलात काम करत होते. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दुसऱ्या पत्नीच्या मुलीने मालमत्तेवर हक्क सांगत याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात मंगळवारी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली.30 मे रोजी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. अशात कोविड योद्धांच्या वारसांना राज्य सरकारने विशेष मदत जाहीर केली आहे. त्याप्रमाणे दिवंगत कर्मचाऱ्याला सुमारे 65 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे. पण, या रकमेवर दावा दाखल करणारे दोन अर्ज सरकारकडे पोहोचले. कर्मचाऱ्या दोन्ही पत्नींनी त्यांच्या आर्थिक मालमत्तेवर अधिकार दाखवला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीने मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. बाबा हे आमच्या घराचा आधार होते. त्यामुळे त्यांची आर्थिक मदत आम्हाला मिळाली नाही तर आमच्यावर कठीण परिस्थिती ओढावेल असं मुलीने याचिकेत म्हटलं आहे.दरम्यान, संपूर्ण रक्कम ही न्यायालयात जमा करण्यात आली असून न्यायालयाने समान न्याय करत रक्कम द्यावी अशी मागणी सरकारी वकिल ज्योती चव्हाण यांनी केली. यानंतर आज यावर सुनावणी करण्यात आली. यावेळी गुरूवारी होणाऱ्या पुढील सुनावणीला पहिली पत्नी आणि तिच्या मुलीने याबाबत खुलासा करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत