पश्चिम महाराष्ट्रातील वीजग्राहकांकडून 580 कोटींच्या थकबाकीचा भरणा

ताज्या घडामोडी पुणे

महावितरणची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी वीजबिल भरण्यास वेग

पुणे, : गंभीर स्वरुप धारण केलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करा या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 4 लाख 54 हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या 23 दिवसांमध्ये 579 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे. गेल्या 1 एप्रिल 2020 पासून या ग्राहकांनी एकदाही वीजबिल भरलेले नव्हते. मात्र वीजबिल भरण्यास सर्वच थकबाकीदार ग्राहकांनी आता वेग दिला आहे.

सद्यस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 26 लाख 47 हजार वीजग्राहकांकडे एकूण 1690 कोटी 54 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये अद्यापही 1 एप्रिल 2020 पासून एकही वीजबिल न भरलेल्या 9 लाख 32 हजार वीजग्राहकांकडे असलेल्या 687 कोटी 97 लाख रुपयांचा समावेश आहे. या सर्वच ग्राहकांनी महावितरणवरील आर्थिक संकट दूर करण्यासाठी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

गेल्या एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 पर्यंत थकबाकीसाठी एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला नव्हता. मात्र वीजबिलांचा भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कोंडी गंभीर झाली आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मात्र महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवार (दि. 23) पर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 69 हजार 533 ग्राहकांनी 301 कोटी 91 लाख, सातारा- 59 हजार 265 ग्राहकांनी 51 कोटी 52 लाख, सोलापूर- 85 हजार 825 ग्राहकांनी 81 कोटी 22 लाख, कोल्हापूर- 78 हजार 909 ग्राहकांनी 84 कोटी 96 लाख व सांगली जिल्ह्यातील 60 हजार 563 ग्राहकांनी 60 कोटी 31 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व ग्राहकांनी गेल्या एप्रिल 2020 पासून प्रथमच वीजबिलाचा भरणा केला आहे.

थेट संपर्क साधत वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा न केल्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात सुमारे 80 हजार 800 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा 144 कोटी 92 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. आर्थिक अडचण असल्यास वीजग्राहकांना महावितरणकडून सहकार्याचा आधार देण्यात आला आहे. यासाठी हप्त्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *