पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार-गृहमंत्री

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची  माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.  सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे.राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती लवकरच केली जाणार आहे. या प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी या भरतीचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

पोलीस भरतीचा निर्णय मूर्खपणाचा- छत्रपतींची टीका

महाविकास आघाडीने 12 हजार 500 जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा आहे, अशा शब्दांत राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात मराठा समाजही पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी आज आक्रमक आंदोलनाला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाची सध्या लढाई सुरू आहे आणि यात राज्यात कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे, असा सवाल खासदार संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे.

मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे.

कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. तब्बल साडे बारा हजार पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोविडची लागण झाल्याने पोलिसांचं पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत हालचाली सुरू केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *