महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांचे टोचले कान

ताज्या घडामोडी देशविदेश

जळगाव, : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला आहे.

देवेंद्र फडवीसांनी टोला?

तसेच 10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे.

भाजपला बसला आयरामांचा फटका

राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना 123 भाजप आमदार निवडून आणले. मात्र, युती झाल्यावर 107 कसे झाले? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे. मी पून्हा येईन, मी पुन्हा येईल… हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळं असताना पराभव झालाच कसा? असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याची गौप्यस्फोट खडसेंनी यावेळी केला. मात्र, आपण भाजप सोडणार नाही. कारण पक्ष आम्ही उभा केला, असं देखील खडसेंनी सांगितलं.

आणखी काय म्हणाले खडसे…?

खडसे म्हणाले की, एकेकाळी पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अथक परिश्रम घेऊन पक्ष उभारणी केली होती. मागच्या वेळेस तर युती नसतानाही एक हाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात आपलं सरकार होतं, राज्यात अनुकूल परिस्थिती होती. मात्र या अशा नेत्यांमुळे सर्व वातावरण अनुकुल असतानाही पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे, असा टोलाही खडसेंना स्वपक्षीयांना लगावला आहे.

भावना आणि संतापाचा कधी स्फोट होऊ शकतो…

एकनाथ खडसे म्हणाले, ‘मी गेली40 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. मात्र, पक्षानं माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कधी स्फोट होईल, हे मी सांगू शकत नाही, भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचं संकट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *