महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसच्या महिला मंत्र्याने शिवसेनेला बजावले!

ताज्या घडामोडी महाराष्ट्र राजकीय

अमरावती : औरंगाबाद (Aurangabad) शहराच्या नामकरण मुद्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balashaeb Thorat) यांनी खरमरीत पत्र लिहिल्यानंतर ‘काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची गरज नाही’, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिवसेनेला बजावले आहे.

औरंगाबाद नामकरणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी मधील कलह पुन्हा समोर आला आहे. याबाबत यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला.

‘आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढचे बोलता येतील” असा थेट इशाराच यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

‘काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असा उल्लेख सामनामध्ये करून काँग्रेसवर टीका करण्यात आली होती. यावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सामनाला जोरदार उत्तर दिले.

बाळासाहेब थोरातांनी पत्रक काढून सेनेवर हल्लाबोल

तर, ‘औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी राऊत यांना विचारला आहे.

तसंच, ‘गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे’ अशी जळजळीत टीका थोरात यांनी केली.

‘राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे’ अशी खरमरीत टीका थोरात यांनी शिवसेना आणि भाजपवर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *