माढा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठीचे सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर

ताज्या घडामोडी सोलापूर

माढा/ तालुका प्रतिनिधी 
  माढा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठीचे सतरा प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून नगराध्यक्ष पद भूषविलेल्या अनिता सातपुते, राहूल लंकेश्वर, गंगाराम पवार व मिनल साठे यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. 
    माढा नगरपंचायतीच्या निवडणूकीचे आरक्षण नगरपंचायतीच्या सभागृहात जाहीर झाले. प्रांताधिकारी ज्योतीताई कदम, नायब तहसीलदार रविकिरण कदम यांच्या उपस्थितीत  मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली. माढ्याच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवलेल्या अनिता सातपुते यांचा प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला.तर नगराध्यक्ष गंगाराम पवार व राहूल लंकेश्वर यांचे प्रभाग अनुक्रमे सर्वसाधारण महिला व इतर मागास महिला  प्रवर्गासाठी  आरक्षित झाले असल्याने त्यांना सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. उपनगराध्यक्ष पद भोगलेल्या प्रभाकर जाधव व लक्ष्मीबाई राऊत यांचेही प्रभाग अनुक्रमे सर्वसाधारण व अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहेत. 
   शहरातील प्रभाग सात, आठ अकरा व चौदा हे प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने यापैकी कोणत्याही एका प्रभागातून किंवा प्रभाग चारमधील सर्वसाधारण जागेवरून   विद्यमान नगराध्यक्षा मिनल साठे  निवडणूक लढवू शकतात. प्रभाग नऊ मधून साठे, चवरे व कानडे यांना पराभूत करून निवडून आलेले नवखे उमेदवार विद्यमान विरोधीपक्ष नेते चंद्रशेखर गोटे यांचा प्रभाग इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना त्यांच्या पत्नीची उमेदवारी देऊन सुरक्षित ठेवता येणार आहे. प्रभाग सतरामधून पराभूत झालेल्या भांगे गटाचे नेते आनंद भांगे यांचा प्रभाग एक सर्वसाधारण साठी राहिल्याने त्यांना सुरक्षित प्रभाग मिळाला आहे. माढ्याच्या राजकारणात पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या जगदाळे फौंडेशनच्या नगरसेविका तथा पाच वर्षे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राहिलेल्या कल्पना जगदाळे यांचा प्रभाग अनुसूचित जाती साठी आरक्षित झाल्याने त्यांनाही आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग सात मधून विजयी झालेल्या नगरपंचायतीचे पक्षनेते सुभाष जाधव यांचाही प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांनाही तो प्रभाग परत एकदा सुरक्षित झाला आहे. प्रभाग सहामधून नगरसेविका झालेल्या नगरसेविका संजिवनी भांगे यानाही सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. साठे गटाचे नेते शहाजी साठे यांचा गेल्या निवडणूकीत पराभव झाल्याने त्यांना स्विकृत सदस्य घेतले होते त्यांना या आरक्षण सोडतीत त्यांचे प्राबल्य असलेले प्रभाग तीन  व चार सर्वसाधारण साठी आरक्षित झाल्याने त्यांचा सुरक्षित प्रभाग त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभाग बारामधून निवडून आलेल्या अनिता चवरे यांचाही प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांनाही आता सुरक्षित प्रभाग शोधावा लागणार आहे. 
   सध्या माढा नगरपंचायतीत साठे गटाचे अकरा सदस्यांसह स्पष्ट बहुमत असून राष्ट्रवादीच्या झुंजार भांगे गटाचे चार सदस्य, राजाभाऊ चवरे गटाचा एक, जगदाळे गटाचा एक असे बलाबल आहे. कानडे गटाला गेल्या निवडणूकीत पूर्ण पणे अपयश आले होते परंतू या आरक्षण सोडतीत त्यांच्या हक्काच्या प्रभागातील पडलेले आरक्षण हे कानडे गटाला नवसंजीवनी देणारे असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *