सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समितींच्या निवडणुकीत 4 जागांवर भाजप तर तीन जागांवर महाविकास आघाडीचा विजय

ताज्या घडामोडी सोलापूर

सोलापूर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला सोबत घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समितींच्या निवडणुकीत उतरणाऱ्या महाविकास आघाडीला तीन जागांवर यश प्राप्त झालंय. तर पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजने 4 समित्यांवर विजय प्राप्त केलाय. विषय समितींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमसोबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी दगफटका केला. त्यामुळे एमआयएमने ही चक्क भाजपला मतदान करुन पुरेपूर बदला घेतलाय.

सोलापूर महानगर पालिकेच्या सात विषय समितींच्या निवडणुका आज पार पडल्या. यामध्ये भाजपने तीन जागांवर थेट तर वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समिती निवडीत पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या अनिता मगर यांना भाजपने मतदान केल्याने आणखी एक जागा बळकावण्यात यश आले. तर महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या वहिदाबी शेख यांना या निवडीत पराभव स्विकारवा लागला. तर शहर सुधारणा समितीच्या निवडीत शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी देखील महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या उमेदवार शहाजिदाबानो शेख यांना मतदान न करता भाजपच्या मेणका राठोड यांना मतदान केलं. त्यामुळे या ठिकाणी देखील भाजपला विजय प्राप्त करण्यात यश आलं.

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी दोन समितींच्या निवडीत दगाफटका केल्याने एमआयएमने देखील याचा पुरेपूर बदला घेतला. विधी समितीच्या निवडीत एमआयएमच्या नगरसेविका वहिदाबानो शेख गैरहजर राहिल्या. तर सेनेच्या नगरसेविका ज्योती खटके ह्या तटस्थ राहिल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नगरसेवक सी.ए. विनोद भोसले यांना तीन मते प्राप्त झाली. तर भाजपच्या नगरसेविका देवी झाडबुके यांना 4 मत प्राप्त झाल्याने त्यांचा विजय झाला. तर महिला आणि बालकल्याण समितीमध्ये तर एमआयएमने बदला घेत थेट भाजपच्या उमेदवारालाच मतदान केलं. एमआयएमच्या नगरसेविका तस्लीम शेख यांनी भाजपच्या उमेदवार कल्पना कारभारी यांना मतदान केलं. त्यामुळे भाजपला यश प्राप्त करता आले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार मीराबाई गुर्रम यांना पराभव स्वीकारावा लागला.

मंडया आणि उद्यान, स्थापत्य या समितींच्या निवडीत मात्र महाविकास आघाडीला यश प्राप्त करता आले. स्थापत्य समितीच्या निवडीत काँग्रेस नगरसेविका अनुराधा काटकर यांनी भाजपच्या रवि कैय्यावाले यांचा पराभव केला. तर मंडया आणि उद्यान समितीच्या निवडीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक गणेश पुजारी विजयी झाले. तर भाजपच्या अविनाश बोमड्याल यांचा पराभव झाला. कामगार आणि समाज कल्याण समितीची निवड ही चिठ्ठीच्या आधारे करावी लागली. एमआयएमचे नगरसेवक अजहर हुंडेकरी हे निवडणुकीत गैरहजर राहिल्याने भाजपचे उमेदवार सोनाली मुटकिरी आणि शिवसेनेचे उमेश गायकवाड यांना सारखी मते प्राप्त झाली. यावेळी नियमाप्रमाणे चिठ्ठी टाकण्यात आल्या. पारदर्शकता राखण्यासाठी अंध कर्मचाऱ्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार उमेश गायकवाड यांचा विजय झाला.

दरम्यान शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केलं त्यांच्यावर शिवसेनेचे गटनेते महेश कोठे यांनी जोरदार टीका केली. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती न करण्याची सुचना केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएम आणि वंचितला सोबत घेऊन निवडणुक लढवली होती. मात्र काही जणांनी पैशांसाठी गद्दारी केली आहे. त्यांच्याबाबत शहर प्रमुख आणि वरिष्ठ बसून चर्चा करु. पक्षप्रमुख त्यांच्याबाबत काय कारवाई करतील या बाबत सर्वांच लक्ष असेल” अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते महेश कोठे यांनी दिली. तर “पदवीधर मतदारसंघात मिळालेल्या यशावरुन महाविकास आघाडीने साध्या पद्धतीच्या निवडणुकीला अंत्यत प्रतिष्ठेची केली. पण त्यातही चार समित्यांवर भाजपचे सभापती निवडून आले आहेत.” अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.

कोणत्या समितीवर कोणाची बाजी
1. स्थापत्य समिती – अनुराधा काटकर (काँग्रेस)
2. शहर सुधारणा समिती – मेणका राठोड (भाजप)
3. वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य – अनिता मगर (भाजप पुरस्कृत)
4. मंडया आणि उद्यान – गणेश पुजारी (वंचित/महाविकास आघाडी पुरस्कृत)
5. विधी – देवी झा़डबुके (भाजप)
6. कामगार आणि समाज कल्याण – उमेश गायकवाड (शिवसेना)
7. महिला आणि बालकल्याण – कल्पना कारभारी (भाजप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *