लुटारूंची संगत सोडली तर राजू शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेईन-सदाभाऊ खोत

ताज्या घडामोडी महाराष्ट्र

राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नसतो.. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपाची साथ सोडण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात पुन्हा धरण्याचे संकेत दिले आहेत. “राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणूनच राजू शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास उतरले तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर लुटारूंच्या विरोधात आम्ही दोघेही लढलो.. पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर त्यांना परत खांद्यावर घ्यायला मी तयार आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जी मागणी मी केली ती मागणी राजू शेट्टी यांनीही उचलून धरली आहे. त्यांच्यात आणि “माझ्यात शेताच्या बांधावरुन भांडण नाही. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या, ऊसाच्या प्रश्नांवर माझे आणि राजू शेट्टींचे एकमत होत असेल तर एकत्रितपणे साखर सम्राटांच्या विरोधात उभे राहू शकतो” असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

तुम्ही दोघे परत एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता, “राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. काही मुद्द्यांवर आम्ही वेगळे झालो. याचा अर्थ आमच्या विचारांमध्ये मतभिन्नता नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही दोघेही एकाच विचारधारेतील आहोत” असं उत्तर त्यांनी दिलं.

गेल्या काही दिवसांपासून सदाभाऊ खोत हे भाजपावर नाराज आहेत अशी चर्चा आहे. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. भाजपाचा मित्रपक्ष असलेली रयत क्रांती संघटना या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळी चूल मांडताना दिसते आहे. अशात आता सदाभाऊ खोत यांनी राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं वक्तव्य करत राजू शेट्टी यांच्याशी हात मिळवण्याचे आणि भाजपाची साथ सोडण्याचे संकेत दिलेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *