सोलापूर: येत्या 1 ऑगस्टपासून राज्यातील मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरू करण्यास परवानगी देऊन निर्बंध आणखी शिथिल केले जाणार आहेत. आर्थिक आघाडीवर परिणाम होत असल्यानेच या पुढील काळात शहरांमध्ये टाळेबंदी नको, असाच मंत्रिमंडळातही सूर आहे. शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत आणि रेल्वे सर्वासाठी खुली करण्याबाबत केंद्र सरकारच्या निर्णयानंतरच विचार केला जाणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लागू आहेत. जूनमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यात आले, पण रुग्णसंख्या वाढल्याने जुलैच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या विविध भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. सध्या राज्यभरात लागू असलेले निर्बंध 31 तारखेला संपुष्टात येत आहेत. या पाश्वभूमीवर आणखी काही निर्बंध शिथिल करता येतील का, याची चाचपणी करण्यात येत आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, एकदम सारे निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करू या, असेही ते म्हणाले. यापुढील काळात टाळेबंदी नको, अशी सूचना अनेक मंत्र्यांनी के ली. टाळेबंदीमुळे उद्योगधंदे, हातावर पोट असणार्यांचे फारच हाल होत आहेत. पुण्यात टाळेबंदी करूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही याकडे लक्ष वेधण्यात आले. टाळेबंदीने हेतू साध्य होत नाही, असेही काही मंत्र्यांचे म्हणणे होते.
मॉल्स आणि व्यापारी संकुले सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीत सामाजिक अंतराच्या अटी घालून मॉल्स सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आहे. अन्य काही राज्यांमध्ये मॉल्सना परवानगी देण्यात आली आहे, याकडे सरकारी अधिकार्यांनी लक्ष वेधले. मॉल्स सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता काही मॉल्समध्ये सुरक्षेचे उपाय योजणे किंवा अन्य कामे सुरू झाली आहेत. अधिसूचनेनुसार फक्त अत्यावश्यक कामासाठी रिक्षा-टॅक्सी चालविता येतात. ही अट नसावी अशी मागणी करण्यात येत आहे. व्यायामशाळांना परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्याचा सध्या तरी विचार नाही. सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना त्रास होणार नाही या पद्धतीने नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शाळा-महाविद्यालयांबाबत मार्गदर्शक तत्त्वे..
देशभरात शाळा आणि महाविद्यालये 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याची तरतूद केंद्र सरकारनेच केली होती. ऑगस्टसाठी केंद्र सरकारकडून नव्याने मार्गदर्शक तत्त्वे पुढील आठवडयात जाहीर केली जातील. यामध्ये शाळा-महाविद्यालयांबाबतचा निर्णय घेतला जाईल. यानुसारच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनंतर आणखी किती सूट देता येईल, याचा विचार केला जाईल, असेही सांगण्यात आले.
होणार काय?
मॉल्स, व्यापारी संकुले, रिक्षा-टॅक्सी, खासगी कार्यालयांमधील उपस्थिती वाढविणे, व्यायामशाळा सुरू करणे यावर सध्या सरकार पातळीवर विचार सुरू आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर विचारविनिमय करण्यात आला.
उपाहारगृहांबाबत अनिश्चितता..
निवासाची सुविधा असलेल्या हॉटेल्सना परवानगी देण्यात आली असली तरी उपाहारगृहे अद्याप बंद आहेत. घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. उपाहारगृहांबाबत लगेचच निर्णय होण्याची शक्यता कमी आहे, कारण उपाहारगृहांमध्ये गर्दी होण्याची भीती जास्त आहे.