लॉकडाऊन कोरोनामुक्तीचा पर्याय नाही..

संपादकीय

सध्या संपूर्ण जग covid-19 अर्थात कोरोना या विषाणूमुळे होरपळत आहे. जगातील अमेरिका, इटली स्पेन, फ्रान्स असे बलाढ्य आणि विकसित देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू मुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आपण सर्व जाणतो की कोरोनावरती कोणतीही लस अथवा  औषध उपलब्ध नाही म्हणजेच त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. समूह संसर्गाचा धोका असल्या कारणाने लॉक डाऊन हा पर्याय शासनाला कोरोनामुक्तीसाठी योग्य वाटलं.

परंतु लॉकडाऊन हा कोरोना मुक्तीचा पर्याय होऊ शकत नाही. लॉक डाऊन केल्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी होईल या गोष्टींमध्ये काही तथ्य वाटत नाही. काही शास्त्रज्ञांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे.कारण तब्बल तीन महिने शासनाने लॉक डाऊन केला तरीही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच आहेत. सध्या देशामध्ये कोरोनामुळे तीन महिन्यांमध्ये जितक्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्याहीपेक्षा दुप्पट व्यक्ती इथे आधी म्हणजे कोरोना यायच्या आधी अनेक कारणांनी दररोज मृत्युमुखी पडतच होते.

कोरोनामुक्तीसाठी लॉकडाऊनला पर्यायी उपाय शोधणे आता खूप गरजेचे आहे. कारण लॉकडाऊनमुळे सध्या लोकांना किंवा नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या नागरिकांना हाताला काम  नाही.. परिणामी पैशांची चणचण लोकांना भासू लागलेली आहे.. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा लोकांकडे सध्या पैसा नाही.. उपासमार..भूकबळी.. सारख्या समस्या देशात खूप मोठ्या प्रमाणात सध्या उद्भवत आहेत.

लॉकडाऊनमुळे माणसे कोरोनापासून वाचतील परंतु पुढे जाऊन लॉक डाऊन खूप ताणला गेला तर उपासमार.. भूकबळी.. कुपोषण.. वैफल्य.‌. नैराश्य.. आत्महत्या..इत्यादींपासून वाचू शकणार नाहीत हेही तितकंच खरं आहे.शिवाय पोलिसांवरील वाढता ताण.. पोलिसांवर.. डॉक्टरांवर होणारे हल्ले.. डॉक्टर, नर्स, पत्रकार, पोलीस यांना कोरोनाची लागण होण्याची वाढते प्रमाण.. असे एक नाही अनेक दुष्परिणाम या टाळेबंदीमुळे नागरिकांना भोगावे लागत आहेत.

नागरिकांना त्यातल्या त्यात गरिबांनां अन्नासाठी सध्या तडफडावे लागत आहे. स्वतः काम करून कमवण्याची आणि स्वतःची आणि कुटुंबाची उदरनिर्वाह करण्याची क्षमता असूनसुद्धा गरिबांना अन्नासाठी अन्नदात्यांची वाट पाहावी लागत आहे ही शोकांतिका आहे. इतकेच नाही या लॉकडाऊन मुळे जवळ जवळ 70 टक्के कुटुंबामध्ये महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडत आहेत. केवळ मनुष्याला नाही तर प्राणी आणि पक्षांना सुद्धा अन्न पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

अनेक प्राणी पक्षी तर उपासमारी मुळे मृत्युमुखी सुद्धा पडत असतील. ज्यांची यावर्षी लग्न होणार होते अशी लग्नाळु मुलं आणि मुली सध्या बेचैन आणि निराश आहेत. मूठभर मदत देऊन अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या मध्ये झळकण्याचं आणि चमकोगिरी करणाऱ्यांचा प्रमाण वाढले आहे. सरकारने पाचशे रुपये फक्त मदत म्हणून दिलेली आहे परंतु ती मदत आहे की भीक आहे हेही कळायला मार्ग नाही. वाचकहो.. विचार करा 500 रुपयांमध्ये कुटुंबाचे उदरनिर्वाह होईल का? या लॉकडाऊनच्या नावाखाली राजकारण तर चालू नाही ना? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

व्यसनाधीन व्यक्ती त्यांची व्यसनं पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड करत आहेत आणि राग मात्र कुटुंबातील इतरांवर व्यक्त करत आहेत ही व्यथा आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने बघत आहे.. माणुसकी लोप पावत चाललेली आहे.. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार तर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे.. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आज गगनाला भिडलेले आहेत.. काम करण्यास बंदी.. पैसे कमावण्यास बंदी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात तर काळाबाजार परवडणारा नाही..काय करावे तरी काय लोकांनी.. नागरिकांनी..? आता तुम्हीच सांगा..? बाजारामध्ये भाजीपाला, दूध असे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांची तारांबळ उडत आहे.

परिणामी सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे. शिवाय चायना वस्तू मग ती कोणतीही असो बोगस असतात हे आपण सर्वजण जाणतो. आता तर चीन कडून भारत सरकारने मागवलेल्या रॅपिड कोरोना टेस्टींग किटस सदोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्याचा वापर थांबवा असा आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेला आहे.

कारण या टेस्टिंग किटस कोरोना बाधित व्यक्तीचे निष्कर्ष निगेटिव्ह सांगत आहेत आणि कोरोनाची एक ही लक्षणे नसलेल्या व्यक्तीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह सांगत आहे. मग  टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोना झालाय कशावरून? होम कवारंटाईन  मध्ये असलेल्या व्यक्तींचे तर सध्या खूप हाल होत आहेत.

होम कवारंटाईनमधील आणि कोरोना पॉझिटिव रुग्णांचे जगणं पुढे जाऊन फार मुश्कील होणार आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण होत आहे. समाज माध्यमातून अफवा पसरवल्या जात आहेत परिणामी लोकांची भंबेरी उडालेली आहे.कोरोनाबाधित व्यक्ती जणू गुन्हेगार आहे  अशा दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जातआहे. समाज माध्यमातील विविध अफवेने गरोदर माता त्रासलेले आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आबाळ होत आहे.

विद्यार्थ्यांना विविध आजारांामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे. अनेकजण कोरोना बाधित व्यक्तीकडे आज संशयाने पाहत आहेत. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली की त्या व्यक्तीचा सगळं संपलं असाही गैरसमज फार मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पसरत आहे. कोरोना बाधितांच्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार घालावा असा होम कवारंटानचा पोस्टर त्यांच्या घरावर लावले जातात. कोरोना चा संसर्ग झालेल्या अशा डॉक्टरांना सुद्धा लोक शेजारी राहण्यास मज्जाव करत आहेत ही सद्यस्थिती आहे.

हातात हात मिळवणे.. एकमेकांना स्पर्श करणे.. सुद्धा बंद झालेला आहे. कारखान्यातील कामगार.. रोजंदारीवरचे मजूर.. फोटोग्राफर.. रिक्षावाले.. टॅक्सी चालक.. सलून दुकानदार.. मोबाईल.. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअरी करणारे.. यांचा विचार सरकार करणार आहे की नाही?

महिन्याचा सरकारी नोकरांचा पगार शासन कर्ज काढून का होईना पण निश्चितपणे देणार आणि ते व्यवस्थित जगणार परंतु सरकारी नोकरांना सोडून जी इतर वर्गातील कामगार आहेत.. मजूर आहेत यांचा शासन विचार करणार आहे की नाही.. फक्त सरकारी नोकरांना जगवायचा आहे का शासनाला..? बाकीच्यांना जगवायचं नाहीये का शासनाला..?

विचार करा.. सांगण्याचं तात्पर्य इतकाच आहे की या सर्व वरील गोष्टींचा विचार करता टाळेबंदी ऐवजी शासनाने काही नियम आणि अटींच्या आधारे टाळेबंदीला पर्याय शोधणे गरजेचे आहे. 
चिदानंद चाबुकस्वार.. 91 45 61 28 70.. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *