पँगाँग सरोवरापासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण; आज दहावी बैठक

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : पँगाँग सरोवराच्या दोन्ही बाजूंनी सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता आज म्हणजेच शनिवारी भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावरील 10 वी चर्चेची फेरी पार पडणार आहे. यापूर्वी असं सांगितलं जात होतं की, सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 48 तासांच्या आत दोन्ही देशांत बैठक होईल. पण आता ही बैठक आज सकाळी दहा वाजता पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्‍यावरील चुशुलजवळील मोल्डो येथे पार पडणार आहे. जवळपास गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेला दोन्ही देशांमधील तणाव कमी होऊ लागला आहे.

पॅंगाँग सरोवराच्या दोन्ही बाजूने सैन्य, तोफा व इतर उपकरणे काढून घेतली आहेत. मिळालेल्या बातमीनुसार, आज होणार्‍या या बैठकीत दोन्ही देश देपसांग, हॉट स्प्रिंग्ज आणि गोगरा येथील सैन्य माघार घेण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. पँगाँग सरोवराचे सॅटेलाईट फोटोंनुसार चीनी लष्करी छावण्या हटवल्याची माहिती समोर आली आहे. या छावण्या गेल्या जानेवारीपासून तेथे उभारण्यात आल्या होत्या.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं की, दोन्ही देशांनी पँगाँग सरोवरापासून माघार घेण्याचं मान्य केलं आहे. या सैन्य माघारानंतर लडाखमध्ये सुरू असलेले इतर प्रश्न संपविण्यासाठी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडेल, अशी माहिती त्यांनी दिली होती. या वाटाघाटीमध्ये भारताचं कसलंही नुकसान झालं नाही, असा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *