करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय तसेच करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात मोठया प्रमाणावर लस संशोधन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारासंदर्भात माहिती देणारी वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर करोना व्हायरसवर झालेल्या संशोधनाचा डाटा, भारतातील संभाव्या लशींच्या क्लिनिक चाचण्यांची माहिती उपलब्ध असेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
२०२१ च्या सुरुवातीला भारतात करोनावरील पहिली लस उपलब्ध होऊ शकते, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे. मागच्या २४ तासात ८२ हजार १७० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार सोमवारी भारतात करोना रुग्णांचा आकडा ६० लाखाच्या पुढे गेला. भारतात सध्याच्याघडीला तीन लशी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.
ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली. सिरम इन्स्टि्टयूट या लशीची निर्मिती करणार आहे. स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. झायडस कॅडिला तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ स्वयंसेवकांची निवड केली आहे. त्यातील १२ जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.