भारतात जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या वापराला मंजुरी, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

0
43

केंद्र सरकारने Johnson and Johnson च्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर पडली आहे. त्यामुळे आता भारताकडे करोनाविरोधात एकूण ५ लसी असणार आहेत. याआधी कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना भारतात वापराची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. “भारतानं आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात करोनाविरोधात ५ लसीचा परवानगी आहे. यामुळे देशाच्या करोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल”, असं ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.

पहिली सिंगल डोस लस!

दरम्यान, भारतात परवानगी मिळालेली जॉनसन अँड जॉनसन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीनं केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे.  करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

भारतानं ५० कोटी डोसचा टप्पा केला पार!

करोनावर आता भारतात ५ लसी देता येणार असल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतानं शुक्रवारी रात्रीपर्यंत देशात ५० कोटी लसीचे डोस देऊन झाले आहेत. ५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “करोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here