खडी केंद्रांच्या धुळीमुळे शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर

ताज्या घडामोडी महाराष्ट्र


तामलवाडी सरहद्दीवर खडी केंद्रांना आला ऊत; जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज


तामलवाडी– तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीच्या सरहद्दीवर असलेल्या जवळपास 15 खडी केंद्रांमुळे परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील खडी केंद्राचाही समावेश आहे. दरम्यान, या खडी केंद्रांचा अनेक शेतकर्यांना, इतर कारखानदारांना  गेल्या तीन-चार वर्षांपासून त्रास होत असून, या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानेच आता कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा सरहद्दीवर जवळपास 10 ते 15 खडी केंद्रे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत चार खडी केंद्र असून, उर्वरित खडी केंद्र हे सोलापूर जिल्हा हद्दीमध्ये आहेत. या खडी केंद्रांच्या माध्यमातून खडीपासून क्रशर तयार करण्याचे काम अविरत सुरू आहे. बहुंतांश केंद्रांमध्ये 24 तास काम सुरू असते. सध्या वाळूची कमतरता भासत असल्यामुळे बांधकामासाठी बारिक क्रशर व डस्टला मोठी मागणी वाढली आहे. परिणामी या खडी केंद्रांमधून मोठ्या प्रमाणात खडी क्रश करून याची निर्मिती केली जात आहे.
 यामुळे सातत्याने धुळीचे लोट या केंद्रातून बाहेर पडत असतात. हीच धुळच शेतकर्यांसाठी व परिसरातील इतर कारखानदारांसाठी घातक ठरत आहे. धुळ बारिक वाटत असली तरी याचे लेअर पिकांवर तसेच जमिनीवर साठत आहेत. परिणामी पिकांची वाढ खुंटत असल्याची खंत अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली. काही शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा उपयोग करून पिके जगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उंचीने लहान असलेल्या पिकांसाठी हा प्रयोग यशस्वी ठरत नाही. अन्य उंच पिकांना वाचवणे शेतकर्यांना या धुळीमुळे अशक्य होत आहे. सद्यस्थितीत परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक बनत आहे. या खडी केंद्राचा सर्वाधिक फटका तामलवाडी गावातील शेतकर्यांना बसत असून, या खडी केंद्राच्या धुळीमुळे फळबाग पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतीच्या उत्पन्नात मोठी घट होत असून, या भागातील शेतकर्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इतकेच कायतर सोलापूर-तुळजापूर या महामार्गावरही धुळीचे लोट दिवसभर येतात. यामुळे उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने संबंधित खडीकेंद्रावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कारवाई करावी तसेच या परिसरात नवीन होणार्या खडी क्रेशरला कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी तामलवाडी येथील शेतकरी सुनील निवृत्ती सावंत, ज्ञानेश्‍वर जगताप, बाळासाहेब जगताप, विठ्ठल भाकरे आदी शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
…………………………………………………………………………  
साडेपाच एकर जमीन नापीक
खडी क्रेशरच्या धुळीमुळे माझी साडे पाच एकर जमीन पूर्णपणे नापीक झाली आहे. शेतामध्ये केलेली कोणतीही पिके हाती येत नाहीत. याप्रकरणी आता तालुका अन्‌ जिल्हा प्रशासनाकडून कठोर कारवाई गरजेची आहे.
 विठ्ठल भाकरे, शेतकरी, तामलवाडी
………………………………………………………………………….    
शेताचे अतोनात नुकसान
खडी केंद्रांमुळे आमच्या शेतीचे अतोनात नुकसान होत असून, पॉलीहाऊसमधील पिकांवर सुद्धा या धुळीचा परिणाम होत आहे. सौर ऊर्जेच्या पॅनलवर धुळीचा थर साचत आहे. त्यामुळे आमच्या मोटारी बंद आहेत. संबंधित अधिकार्यांनी याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी.
ज्ञानेश्‍वर जगताप, शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *