देश-विदेशातील ‘अत्तराची कुप्पी’ संग्रहात

ताज्या घडामोडी सोलापूर


माजी सैनिक रेळेकर यांचा अनोखा छंद : ५० वर्षांपासून जपताहेत संग्रह 

सोलापूर : अत्तराची बाटली संपली तरी ती जपायची असते कारण अत्तर संपले तरीही सुवास संपत नसतो. त्याप्रमाणे सोलापुरातील एका अवलियाने विविध रंगाच्या अाणि आकारातल्या देश-विदेशातील तीनशेहून अधिक अाकर्षक अत्तराच्या बाटल्यांचा युनिक संग्रह केला आहे. जगभरातून गोळा केलेल्या दुर्मीळ अशा ‘बॉटल’ला आपल्या दिवाणखान्याचा एक भाग बनवून घेतला आहे. पर्यटनाची आवड आणि काचेच्या बाटलीवर विशेष प्रेम असणार्‍या या संग्रहकांचे नाव दिवाकर रेळेकर असं अाहे.

शहरातील शुक्रवार पेठ परिसरात राहणारे दिवाकर रेळेकर वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय सेनेत १९६२ साली ज्युनिअर कमिशंड ऑफिसर म्हणून भरती झाले होते. ते भारतीय सेनेतून सोलापुरात परत येऊन भारत संचार निगम लिमिटेडमध्ये सेवा करत २००३ साली निवृत्त झाले. श्री रेळेकर यांना सुंगधी अत्तर खरेदी करण्याची अावड. यातूनच पुढे त्यांना बाटल्या संग्रह करण्याचा छंद जडला. संग्रहासोबतच त्यांना पर्यटनाची प्रचंड आवड. अाजही दरवर्षी ते एका देशाला भेट देतात. पर्यटनाच्या आवडीमुळे त्यांना हा छंद जडला. अतिशय सुंदर आणि शोभनीय या बॉटलचे कलेक्शन त्यांच्याकडे आहे.

आपल्या घरातील दिवाणखान्यामध्ये या बाटल्यांना विशेष स्थान दिले आहे. घरात येणाऱ्या पै-पाहुण्यांचे या अत्तराच्या बाटल्या लक्ष वेधून घेतात. डोळे दिपवून टाकणारा हा संग्रह पाहून अनेक जण भारावून जातात अाणि ७७ वर्षीय श्री रेळेकर यांचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या भारतीय सेना सेवाकाळात ते जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, आसाम, अंदमान-निकोबार, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश या राज्यांत सेवा करताना विविध आकाराच्या अत्तर बॉटलचे कलेक्शन केले अाहे.

सेवानिवृत्तीनंतर पुन्हा इंग्लंड, जर्मनी, फॉरेन्स, स्वित्झर्लंड, पॅरिस, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, बेल्जियम, व्हेनिस, इटली, रोम इत्यादी देशाच्या प्रवासात सुद्धा त्यांनी विविध सेंट बॉटलचे कलेक्शन करून एकत्र ठेवले अाहे. बुटाच्या आकाराच्या, टेलिफोन, मानवी ओठ, विजेचा दिवा, रेल्वेचा कंदील, पशु-पक्षी यांच्या विविध आकाराच्या बाटल्यांनी त्यांचा संग्रह फुलला अाहे.
रेळेकर यांच्या संग्रहात एकाहून एक ‘उंची’ ठेवा पाहायला मिळतो. गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला हा संग्रह अाजही जपून ठेवला आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\

रंगीबेरंगी दगड-गोटे संग्रहात 

श्री. रेळेकर यांच्या संग्रहात दरवर्षी एका नव्या बाटलीची भर पडत असते. पाहता-पाहता या त्यांच्याकडे आज तीनशेहून अधिक दुर्मीळ व उंची अत्तराच्या बाटल्या जमा झाल्या आहेत. एक ते तीन डॉलर किंमतीचे अत्तर बॉटल त्यांच्याकडे संग्रही आहेत. यासह देश-विदेशातील नद्यांतील वैविध्यपूर्ण रंगबेरंगी दगडगोटे देखील संग्रही आहेत. इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेलमध्ये बंदी करून ठेवले होते. हे संपूर्ण जेल चुन्यांनी बांधले होते. या इमारतीच्या बांधकामाचा चुना रेळेकर यांनी एका बाटलीत संग्रहित ठेवला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *