सोलापूर : एकवीस खत दुकानांचे परवाने निलंबित

ताज्या घडामोडी सोलापूर

कृषी विभागाची कारवाई

            सोलापूर: कृषी सेवा केंद्र चालकांना अनुदानित खत पॉस मशिनवर नोंदणी करून विकणे बंधनकारक आहे, काही केंद्र चालकांनी याचा भंग केला असल्याने जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्रांचे परवाने 10 दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

            शासन अनुदानित खतांची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना पॉस  मशिनवर अंगठ्याचा ठसा नोंदवून खते मिळत होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगठा नोंदविण्याऐवजी आधार क्रमांक पॉस मशिनवर नोंदवून खते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते देताना त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी इतरांच्या नावाने पॉस मशिनवर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. खतांच्या वितरणामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही, मात्र पॉस मशिनवर नोंदणी व्यवस्थित न केल्याने 21 कृषी सेवा केंद्र चालकांचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवला होता. त्यानुसार 21 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती श्री. माने यांनी दिली.

            पंढरपूर तालुक्यातील सात, दक्षिण सोलापूर-दोन, माळशिरस-एक, बार्शी-एक, माढा-पाच, उत्तर सोलापूर-1 आणि मंगळवेढा तालुक्यातील चार परवाने निलंबित केले आहेत.

            शेतकऱ्यांनी कोणतेही अनुदानित खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडे आपले आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. दर महिन्याला प्रत्येक तालुक्यातील सर्वात जास्त खते खरेदी करणाऱ्या खरेदीदारांची शहानिशा होणार असून यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *