IIT आणि NIT मध्ये आता मातृभाषेतून इंजिनीअरिंगचे शिक्षण: शिक्षण मंत्रालय

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: पुढच्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना आता आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) आणि एनआयटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स)  इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम हा मातृभाषेत करता येणार आहे. यासंबंधी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

बैठकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की टेक्निकल शिक्षण विशेषत:  इंजिनीअरिंगचे शिक्षण हे मातृभाषेत उपलब्ध करुन देण्याचा लाभकारी निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. ही सुविधा पुढच्या शैक्षणिक सत्रापासून अंमलात येणार आहे. यासाठी काही आयआयटी आणि एनआयटी संस्थांना निवडण्यात येणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून प्रतियोगी परीक्षांसाठी अभ्यासक्रम आणण्याचाही विचार करण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप आणि इतर फेलोशिप विद्यार्थ्यांना वेळेत देण्यात यावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुरु करावा असाही प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.

एनटीएने गेल्या महिन्यात हिंदी आणि इंग्रजीच्या व्यतिरिक्त स्थानिक भाषांत जेईईच्या मुख्य परीक्षा घेण्याची घोषणा केली होती. परंतु आयआयटीने अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी की नाही याबाबत अद्याप कोणतंही मत वा सूचना दिल्या नाहीत.

आयआयटी आणि एनआयटी  इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम मातृभाषेत सुरु केल्याने त्याचा फायदा देशातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याची आशा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी त्यांनी आपले विचार सार्वजनिक सभेत आणि सेमिनारमध्ये व्यक्त केले. नवे शिक्षण धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्याचे सर्व शिक्षण मातृभाषेत व्हावे अशी तरतूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *