सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन; पत्नीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

0
167

करमाळा : सासरच्या कुटुंबीयांकडून छळ केल्यानं एखाद्या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा याठिकाणी पत्नीनं आणि तिच्या घरच्यांनी छळ  केल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावणे अशा विविध कारणातून मानसिक छळ केल्यानं संबंधित तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.अभिजित कांतीलाल घोगरे असं संबंधित आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील रहिवासी आहे. मृत अभिजित याचा मागील काही दिवसांपासून विविध कारणांसाठी पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. काही दिवसांपूर्वी मृत अभिजित याची पत्नी कोणतही कारण नसताना, घर सोडून माहेरी गेली. यामुळे अभिजितनं पत्नीला घरी येण्यासाठी अनेकदा विनवणी केली. पण सासरच्या कुटुंबीयांनी पत्नीला पाठवण्यास नकार दिला.तसेच, जमीन पत्नीच्या नावावर करून देण्याचा तगादा लावला. यासाठी तरुणावर मानसिक दबाब टाकला जात होता. एवढंच नव्हे तर, आरोपींनी जावयाकडून बांधकाम करून घेतलं आणि त्याचे पैसेही दिले नाहीत. सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या अशा त्रासामुळे अभिजित यानं घरातील लोखंडी नळीला ड्रीपच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केली आहे.ही घटना उघडकीस येताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नातेवाईक आणि कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर पोलसांनी मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here