IPL 2020 : सीएसकेला धक्का; स्टार खेळाडूकडून बायो बबलचं उल्लंघन

ताज्या घडामोडी देशविदेश

IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनचं आयोजन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारताबाहेर दुबईत करण्यात आलं आहे. आयपीएलच्या 13व्या सीझनच्या आयोजनासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ या सर्वांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं आहे. आयपीएलच्या आयोजनासाठी बायो बबलचे नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. तसेच बायो बबलचे नियम तोडणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा देण्यात येणार आहे. आता बायो बबलचा फटका सीएसकेचा वेगवान गोलंदाज एम. आसिफला बसला आहे. एम. आसिफ आयपीएलचा बायो बबलचे नियम मोडणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज एम. आसिफने काही दिवसांपूर्वी बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन केलं. आसिफकडून आपल्या हॉटेलच्या रूमची चावी हरवली होती. त्यानंतर आसिफ दुसरी चावी घेण्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला. परंतु, बायो बबल प्रोटोकॉलमध्ये रिसेप्शन एरियाचा समावेश होत नाही. त्यामुळे आसिफला बायो बबल तोडण्यासाठी 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागणार आहे.

आसिफची ही पहिलीच चूक होती त्यामुळे फक्त क्वारंटाईन ठेवण्यात आलं आहे. जर आसिफने या सीझनमध्ये पुन्हा एकदा चूक केली तर मात्रा त्याला आपल्या चुकीची शिक्षा म्हणून आयपीएलच्या 13व्या सीझनमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिलेल्या माहितीनुसार, आसिफचा क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि त्याने संघासोबत पुन्हा प्रॅक्टिस करण्यास सुरुवात केली आहे.

कठोर शिक्षेची तरतूद

आयपीएलच्या 13व्या सीझनमध्ये बायो बबल तोडणाऱ्या खेळाडूला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. पहिल्यांदा बायो बबल मोडल्यामुळे एका खेळाडूला 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईनमध्ये पाठवण्यात आलं आहे. दुसऱ्यांदा जर ही चूक झाली तर त्या खेळाडूला एका सामन्यासाठी बाहेर बसावं लागू शकतं. तिसऱ्यांदा जर पुन्हा त्याच खेळाडूने अशी चूक केली, तर मात्र त्या खेळाडूला आयपीएलच्या 13व्या सीझनमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. एवढचं नाहीतर बायो बबल मोडणारा खेळाडू ज्या संघातील असेल त्यांना त्याची रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

बायो बबल म्हणजे काय?

आयपीएल 2020 स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बायो बबलची व्यवस्था करण्यात आली आहे. बायो बबलसाठी कडक नियमावली सक्तीने लागू करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना बायो बबल (जैव सुरक्षित) वातावरणामध्ये राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचा संपूर्ण स्पर्धेदरम्यान बाहेरील जगाशी संपर्क राहणार नाही. यामध्ये कुठल्याही प्रकारची कुचराई खेळाडूंनी करून चालणार नाही, जर खेळाडूंनी कोणत्याही कारणास्तव बायो बबलचे नियम मोडले, तर मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंचे जग हे हॉटेल, सरावाचे मैदान आणि आयपीएल लढती एवढ्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. तसेच आयपीएलचे सामनेही रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्यात येत आहेत.

दरम्यान, आयपीएल 2020 पूर्वी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेमध्ये खेळाडूंसाठी बायो बबल व्यवस्था लागू करण्यात आली होती. मार्च महिन्यात संपूर्ण जागभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यानंतर इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले होते. त्यावेळी बायो सिक्योर फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. यालाच बायो बबल व्यवस्था म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *