श्रीनगर, : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शिया आणि सुन्नी या मुस्लिमांच्या दोन्ही गटांकडून काश्मीरच्या मुद्द्यावर मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीर राज्य भारतात विलीन झालं तो दिवस 27 ऑक्टोबर आहे. या दिवशी पाकिस्तान काळा दिवस पाळतं. पण या वर्षी 27 ऑक्टोबरला सौदी अरेबिया आणि इराण या इस्लामी देशांनी त्यांच्या देशांतील पाकिस्तानी दूतावासांना काळा दिवस पाळण्याची परवानगी दिली नाही. सौदी अरेबिया आणि इराण यांनी या पूर्वीची भूमिका बदलल्यामुळे पाकिस्तानची पश्चिम आशियात मोठी निराशा झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार या विषयांतील जाणकारांनी सांगितलं की इराणमधील पाकिस्तानींनी तेहरान विद्यापीठात काळा दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानच्या या कार्यक्रमाला इराणने आश्चर्यकारकपणे परवानगी नाकारली. त्यानंतर पाकिस्तानी दूतावासाला केवळ एक ऑनलाईन सेमिनार आयोजित करणं भाग पडलं.
इराणने दिलेल्या धक्क्यावरून हे स्पष्ट झाले की, भारताने कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानने केलेल्या विरोधाला मुस्लिम देशांचा पाठिंबा मिळवण्यात पाकिस्तान अपयशी झाला आहे. इतकंच नाही तर सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये सुद्धा पाकिस्तानला हा कार्यक्रम घेण्यास परवानगी मिळाली नाही. प्रभावशाली मुस्लीम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया आणि इराणकडून पाकिस्तानला मिळालेला हा खूपच मोठा धक्का आहे. खरं तर एकेकाळी सौदी अरेबियाच्या पैशावर वाढलेल्या पाकिस्तानने आता ‘तुर्की’ला आपला मालक बनवलं आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तुर्कीसोबत सौदी अरेबिया व्यतिरिक्त आणखी एक इस्लामिक गट स्थापन करण्याचा इशाराही दिला होता. यामुळे सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान हे पश्चिम आशियातील आपला प्रभाव वाढवण्यासाठी 500 वर्षांपूर्वीच्या ऑटोमन साम्राज्याच्या धर्तीवर देशाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
तुर्की आणि सौदी अरेबियामध्ये वाढतोय तणाव
या कारणास्तव तुर्की आणि सौदी अरेबिया या दोन सुन्नी देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तान आणि तुर्कीमधील वाढती मैत्री नुकतंच एफएटीएफच्या बैठकीत दिसून आली. द फायनॅन्शियल अक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं आहे. या लिस्टमधून पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी फक्त तुर्कीनेच पाठिंबा दिला होता. अझरबैजानविरुद्ध अर्मानिया युद्धात तुर्की आणि पाकिस्तान अझरबैजानला पाठिंबा देत आहेत