वैतागून वेळापूरच्या 15 कुटुंबांनी मागितली इच्छा मरणाची परवानगी

ताज्या घडामोडी सोलापूर

वेळापूर : माळशिरस तालुक्‍यातील वेळापूर येथील बचत गट व मायक्रो फायनान्स यांच्या कर्जवसुली व अर्वाच्च बोलण्याला वैतागून 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इच्छा मरणाबाबत परवानगी मागणारे निवेदन दिले आहे. 

या निवेदनामध्ये वेळापूर येथील सिकंदर कोरबू यांनी लॉकडाउन व कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळलेली आहे व अशातच बचत गट व मायक्रो फायनान्स यांचे प्रतिनिधी घरी येऊन कर्ज वसुलीसाठी तगादा लावत असून अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे म्हटले आहे. यामुळे कोरबू यांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 सप्टेंबरपर्यंत आपण इच्छामरणाची परवानगी द्यावी, अन्यथा आपण परवानगी दिली असे समजून महाराष्ट्रातील कोणत्याही तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.यासह वेळापूर येथील अन्य 14 कुटुंबातील सदस्यांनीही मुख्यमंत्री यांच्याकडे अशीच इच्छा मरणाबाबत परवानगी मागितली असून, शासनाने एक तर सर्वसामान्य माणसांनी व महिलांनी घेतलेली बचत गट व मायक्रो फायनान्स यांची कर्जे माफ करावीत, अन्यथा आम्हाला इच्छा मरणास परवानगी द्यावी व आमचा मानसिक व आर्थिक छळ कमी करावा, अशी विनंती केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार माळशिरस, प्रांताधिकारी अकलूज, उपविभागीय पोलिस अधिकारी, अकलूज त्याचसोबत आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र देऊन या प्रकरणी मार्ग काढू आमदार राम सातपुते यांनी या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन, तणावात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. आजच मी मुख्यमंत्र्यांना तातडीने पत्र देतो. या प्रकरणी आपण मार्ग काढुयात, असे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *