कधीकाळी धर्मेद्र होते ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात

ताज्या घडामोडी मनोरंजन मुंबई

मुंबई – बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रेमप्रकरणांची नेहमीच चर्चा होत असते. बॉलिवूडमधील काही प्रेमप्रकरणे इतकी  गाजली होती, की त्यांची चर्चा आजही केली जाते. बॉलिवूड कलाकारांवर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना, कलाकारांच्या खासगी आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे अशा लोकप्रिय कलाकारांच्या प्रेमप्रकरणांना चांगलीच प्रसिद्धी मिळते..

बॉलिवूडमध्ये गाजलेल्या काही प्रेमप्रकरणांमध्ये समावेश होतो तो बॉलिवूडचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र आणि ‘ड्रीमगर्ल’ हेमामालिनी  यांचा. आजही त्यांच्या प्रेमप्रकरणाची तेवढ्याच उत्साहानं चर्चा होते. धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालं होतं. मात्र हेमामालिनी यांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.

अभिनेत्री मीनाकुमारी यांच्या बरोबरही त्यांचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर आणखी एका अभिनेत्रीशी त्यांचे नाव जोडले गेले होते. ती अभिनेत्री म्हणजे अनिता राज. एबीपी लाइव्हनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे, हेमामालिनी यांच्याशी लग्न झाल्यानंतर धर्मेंद्र यांचे अनिता राज यांच्याशी नाव जोडलं जाऊ लागलं होतं. हेमामालिनी यांना या प्रकरणाची कुणकुण लागल्याचं लक्षात आल्यानंतर मात्र धर्मेंद्र यांनी अनिता राज यांच्या समवेतचं आपलं नातं कायमचं संपवलं. दोघंही या नात्याबाबत खूपच गंभीर असल्याचं म्हटलं जातं.

200 पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांत इन्स्पेक्टरची भूमिका साकारून विक्रम नोंदवणारे अभिनेते जगदीश राज  यांची कन्या म्हणजे अनिता राज. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अनिता राज यांनी ह्रषिकेश मुखर्जी यांच्या ‘अच्छा-बुरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं; पण त्यांना फार मोठं यश मिळालं नाही. अनिता राज यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबर नौकर बिवी का, नफरत की आंधी, जीने नही दूंगा इत्यादी चित्रपटात काम केलं होतं. त्याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं. दोघंही खूप जवळ आले होते; मात्र नंतर धर्मेंद्र यांनी या नात्याला पूर्णविराम दिला.

अनिता राज यांनाही चित्रपटात फार यश न मिळाल्यानं त्यांनी काम करणं थांबवलं आणि 1986 मध्ये चित्रपट निर्माते सुनील हिंगोरानी यांच्याशी विवाह करून त्या संसारात रमल्या. आता अनेक वर्षांनी त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं असून छोटी सरदारनी, एक था राजा एका थी रानी अशा काही मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा चाहत्यांना त्यांचे दर्शन होत असून जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *