आठवी पास तरुणाने तयार केलं हेलिकॉप्टर; पण नशिबाने दिली नाही साथ; उड्डाण घेतलं अन्…

0
44

यमतमाळ : केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने तयार केलेले हेलिकॉप्टर सरावादरम्यान पंखा तुटल्याने उड्डाण भरायच्या आधीच जमीनदोस्त झाले. या अपघातात शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिमचा जागीच मृत्यू झालाय. मुन्ना हा २४ वर्षांचा होता. तो यमतमाळमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगीचा रहिवाशी होता. अपघाताची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्यासुमारास घडली. यवतमाळच्या रँचोचे आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न या अपघाताने धुळीस मिळाल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

पत्राकारागीर असलेल्या शेख इस्माईलने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःच हेलिकॉप्टर बनविले. १५ ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडविणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री त्याचा सराव सुरू होता. या दरम्यान हेलिकॉप्टरच्या मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळला. यात तो जागीच गतप्राण झाला.

शेख इस्माईल पत्राकारागीर असल्याने तो लहान आकाराची कपाटं, कुलर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवायचा. त्याचे शिक्षण फक्त आठवीपर्यंतच झालेले होते. एक दिवस त्याला हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना सुचली. आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर तयार करण्यास सुरूवात केली. हेलिकॉप्टरसाठी लागणारा एक एक सुटा भाग तो तयार करीत होता. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न साकार होणार होते. मात्र मंगळवारी रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले. इंजिन ७५० अ‍ॅम्पियरचे होते. सराव व्यवस्थित सुरू असताना अचानक हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर धडकला. आकाशाला गवसणी घालण्याआधीच शेख इस्माईलने डोळे मिटले.

शेख इम्माईलच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. शेख इस्माईलचे गावाचे नाव जगभर पोचविण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरीकांनी फुलसावंगी गावात धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here