कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त : हमिद अन्सारी

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : “कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे,” असं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केलं आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशाच्या वेळी ते बोलत होते. “कोविड अतिशय वाईट महामारी आहे परंतु याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे,” असं अन्सारी म्हणाले. तसचं “धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादापेक्षा देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
हमिद अन्सारी म्हणाले की, “आज आपला देश कोरोनाव्हायरसच्या महामारीशिवाय आणखी दोन महामारींचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा या महामारींचा धोका अधिक दिसत आहे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासलं आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे. देशप्रेम हे सैन्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त संरक्षणात्मक आहे.”
“आज देश अशा विचारधारेच्या धोक्यात दिसत आहे, जी “आम्ही आणि ते” या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर विभाजनाता प्रयत्न करते,” असं अन्सारी म्हणाले. मोदी सरकारवर निशाणा साधताना हमिद अन्सारी म्हणाले की, “चार वर्षांच्या अल्पकाळातच भारताने ‘उदार राष्ट्रवाद’वरुन ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’पर्यंतच्या अशा राजकीय संकल्पनेचा प्रवास केला आहे जी लोकांच्या मनात घर करुन बसली आहे.”
हमिद अन्सारी आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. आपली मतं ते कायमच स्पष्टपणे मांडत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहे. वंदे मातरम गाण्यावरुन केलेलं वक्तव्य असो वा मुस्लिमांना भारतात असुरक्षित वाटतं हे वक्तव्य किंवा योग दिवसाच्या कार्यक्रमात सामील न होणं, यावरुन हमिद अन्सारींवर टीकाही झाली होती. आताच्या वक्तव्यावरुनही त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *