2021 सालच्या हज यात्रेसाठी कोणत्या शहरातील यात्रेकरूंना किती रूपये खर्च करावे लागतील? येथे पाहा

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : 2021 सालच्या हज यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी कोणत्या हज यात्रेकरूला किती रूपये खर्च करावे लागतील, हेदेखील निश्चित करण्यात आलं आहे. ज्या विमानतळावरून  विमानप्रवासाला सुरूवात होणार आहे, त्या शहरानुसार हज यात्रेकरूंना पैसे खर्च करावे लागतील. विशेष म्हणजे यावेळी इम्बार्केशन पॉईंट्सच्या संख्येतही घट करण्यात आली असून ती 10 एवढी करण्यात आली आहे. त्याचबरोबर हज यात्रेला जाण्यासाठी खुपच कमी अर्ज आल्याने आता अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकण्यात आली आहे. आता 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

इंम्बार्केशन पॉइंटनुसार पैसे आकरले जातील

हज कमिटी ऑफ इंडियाने ठरवलेल्या खर्चाच्या मर्यादेनुसार, अहमदाबाद आणि मुंबई इम्बार्केशन पॉइंट्सवरून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना जवळपास 3 लाख 30 हजार रुपये खर्च करावे लागतील. तर दुसरीकडे, बंगलोर, लखनऊ, दिल्ली आणि हैदराबाद येथून प्रस्थान करणाऱ्या हज यात्रेकरूंना जवळपास 3 लाख 50 हजार रुपये, कोची आणि श्रीनगर येथून प्रस्थान करणाऱ्या हज यात्रेकरूंना 3 लाख 60  हजार रुपये, कोलकाता येथून प्रस्थान करणाऱ्या हज यात्रेकरूंना 3 लाख 70 हजार रुपये आणि गुवाहटी विमानतळावरून प्रस्थान करणाऱ्या हज यात्रेकरूला जवळपास 4 लाख रुपये खर्च येणार आहे. यावर्षी इंम्बार्केशन पॉइंटच्या संख्येत घट करण्यात आली आहे. यापूर्वी पूर्ण देशात इंम्बार्केशन पॉइंटची संख्या 21 होती.

2020 सालच्या हज यात्रेसाठी 2100 महिलांनी ‘मेहरम’  शिवाय (पुरूष नातेवाईकाशिवाय) हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केला होता. या महिला आता हज यात्रेला जाऊ शकणार आहेत. तसेच ‘मेहरम’ शिवाय हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या महिलांचे अर्ज अजूनही स्विकारण्यास सुरू आहेत. त्यासाठी लॉटरी प्रक्रिया अवलंबली जाणार नाही. अशा महिला ऑनलाइन पद्धतीने किंवा हज मोबाइल अॅपद्वारे अर्ज भरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *