मुंबई गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर तेजीनं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात सोन्याला झळाळी आली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तेजी आली. सोमवारी 800 रुपयांनी सोनं महाग झालं असून 51,833 रुपये प्रति तोळा असा दर आहे. जवळपास 1 तोळ्यासाठी ग्राहकांना 52 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं वायदा बाजारातही सोनं महाग झालं आहे. सोन्यासोबतच 8 वर्षात प्रथमच चांदीच्या दरानंही उच्चांक गाठला आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 4 तर चांदीचे दर 15 टक्क्यांनी वाढले आहेत. चांदीसाठी किलोग्राममागे ग्राहकांना 64 हजार 617 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाच्या काळात झालेली सर्वात मोठी वाढ असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर 60 हजारपर्यंत जाणार असल्याचं सराफ बाजारातील काही तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये अशीच वाढ होत राहिली तर सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर जाऊ शकतं.
सराफ बाजारातील सोन्याचे वाढलेले दर
जुलै 2020 अखेरपर्यंत प्रति तोळा 51, 833 हजार
जून 2020 – प्रति तोळा 48,410 हजार
मे 2020 – प्रति तोळा 47,600 हजार
आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 336 रुपयांनी वधारले असून बाजार उघडताच किंमत 51,039 रुपये होती. 23 कॅरेट सोन्याची किंमत 50,835 तर 22 कॅरेटचा भाव 46,752 आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव 38,279 आहे. 16 मार्चपासून सोमवारपर्यंत सोन्याच्या दरात 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.