पीएम आवास योजनेत मराठमोळ्या घोलप जिल्हाधिकाऱ्याचं झारखंडमध्ये उत्कृष्ट काम, पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान

ताज्या घडामोडी सोलापूर

कोडरमा : देशातील सर्व राज्यांमधील नगरपरिषदांअंतर्गत पंतप्रधान आवास योजना (शहरी) सुरु आहे. या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपरिषदांचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर केला जातो. यात झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील झुमरी तिलैया नगर परिषदेने एकूण 3784 घरांपैकी 2025 घरं पूर्ण केली आहेत. तर बाकी सर्व घरं पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. या कामामुळं देशस्तरावर या नगरपरिषदेचा सन्मान होतोय. या कामाच्या मागे दृष्टी आहे ती एका मराठमोळ्या अधिकाऱ्याची. कोडरमाचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त रमेश घोलप यांच्या नेतृत्वात हे यश मिळवलं आहे. झुमरी तिलैया ही झारखंड राज्यातील एकमेव नगरपरिषद आहे जिला ‘बेस्ट परफॉर्मिंग म्युन्सिपल कांऊन्सिल’ म्हणून सन्मानित केलं जाणार आहे, ते ही पंतप्रधान मोदींच्या हस्ते. कोडरमाचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त रमेश घोलप आणि नगर प्रशासक झुमरी तिलैया कौशलेस कुमार यांचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते आज एका ऑनलाईन कार्यक्रमात होणार आहे.

जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी मानले नागरिकांचे आभार
झुमरी तिलैया ही ‘बेस्ट परफॉर्मिंग म्युन्सिपल कांऊन्सिल’ म्हणून झारखंड राज्यातील एकमेव नगरपरिषद ठरल्यानंतर जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी या सन्मानाचं श्रेय स्थानिक नागरिकांना दिलं आहे. जबाबदार नागरिक म्हणून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आवास वेळेत पूर्ण केल्यामुळं हे यश मिळालं. घोलप यांनी झुमरी तिलैया नगर परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचं देखील अभिनंदन केलं आहे.

रमेश घोलप यांची संवेदनशीलता
रमेश घोलप हे संवेदनशील आणि कार्यकुशल अधिकारी म्हणून ओळखले जातात. दिवाळीत त्यांनी संवेदनशीलतेचा परिचय दाखवत कुंभार बांधवांकडून तब्बल एक लाख रुपयांचे मातीचे दिवे विकत घेत त्यांना अनोखी दिवाळीभेट दिली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एक चिमुकली म्हणत आहे की, “चाचा बोले है, जब हमारे मिट्टी के दिये बिक जायेंगे, तब तुम्हे बहुत सारा पटाखा मिलेगा.” असं निरागसपणे बोलणार्‍या चिमुकलीचा व्हिडीओ जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी पाहिला आणि ते थेट आपल्या अधिकाऱ्यांसह थेट कुंभार कारागिरांच्या घरी पोहोचले आणि एक लाख रुपयांचे मातीचे दिवे तेथील कारागिरांकडून खरेदी केले होते.
बांगड्या विकून परिस्थितीवर मात करुन झाले जिल्हाधिकारी
धरणात प्रकल्पबाधित होऊन विस्थापित झालेलं छोटसं सोलापूर जिल्हातील बार्शीतलं महागाव हे रमेश गोरख घोलप यांचं गाव. वडील गेल्यानंतर त्यांच्या आईने बांगड्या विकून, मजुरी करून त्यांना आणि त्यांना भावाला शिकवलं. आईसोबत रमेश घोलप यांनीही बांगड्या विकल्या आहेत. डीएड करुन जिल्हा परिषद शिक्षक झालेले रमेश घोलप यांनी नोकरीचा राजीनामा देत स्पर्धा परीक्षा दिल्या आणि उत्तुंग यश मिळवलं. एकाच वेळी एमपीएससीत राज्यात पहिले तर यूपीएससीत देखील ते यशस्वी झाले.

तरुणाईला ‘उमेद’ देणारा अधिकारी
आता रमेश घोलप कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. त्याआधी ते झारखंड राज्याचे कृषी आयुक्त होते. कृषी आयुक्त असतानाही त्यांनी शेतकरी वर्गासाठी अनेक महत्त्वाची कामं केली. ही सगळी काम करत असताना ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. तिथे ते तरुणाईला नेहमी मार्गदर्शन करतात. उमेद या संस्थेच्या माध्यमातून आपल्या मातीशी नाळ त्यांनी कायम ठेवली आहे. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा संमेलनं तसेच वेगवेगळे उपक्रम ते सुट्टीत बार्शीला आल्यावर राबवत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *