कुटुंब घरात असतानाच महापालिकेने पत्रे ठोकून घरं केली सील

ताज्या घडामोडी देशविदेश

बंगळुरु : करोना रुग्ण सापडल्याने घरं सील करताना महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी घराबाहेर पत्रे ठोकून कुटुंबांनाच घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरुत घडला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. अखेर महापालिका आयुक्तांना याप्रकरणी माफी मागावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका कर्मचार्‍यांनी दोन फ्लॅटचे दरवाजे सील केले होते. या घरांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वास्तव्यास होते.
घटनेनंतर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी तात्काळ पत्रे हटवण्याचा आदेश दिला. तसंच महापालिका कर्मचार्‍यांच्या अतिउत्साही कारवाईबद्दल माफी मागितली. एन मंजुनाथ प्रसाद यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बॅरिकेड्स लगेच हटवले जातील याची मी काळजी घेतली आहे. सर्वांना आदराने वागणूक देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संसर्ग झालेल्यांचं संरक्षण करणं आणि न झालेल्यांना सुरक्षा देणं हा कंटेनमेंटचा हेतू आहे.
बंगळुरु प्रशासन सध्या करोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत आहे. जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन गुरुवारी संपला आहे. दरम्यान मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी यापुढे कंटेनमेंट झोन वगळता दुसरीकडे लॉकडाउन जाहीर केला जाणार नाही असं सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं असून 55 पेक्षा जास्त वय असणार्‍या नागिरकांना घरातच थांबण्याची विनंती केली आहे. कर्नाटकमध्ये गुरुवारी दिवसातील सर्वोच्च करोनाबाधित रुग्णनोंद झाली. गुरुवारी कर्नाटकात 5000 करोनाबाधित रुग्ण आढळले तर 97 मृत्यू झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *