‘त्या’ बलात्कार्‍यावर उपचार करू नका, वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी द्या

मुंबई

पनवेल : पनवेलमधील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि पीडिता दोघेही करोनाबाधित असून त्यांना काही दिवसापूर्वी क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणावरू मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. उपचाराअंती तो आरोपी वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केली.
शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. पनवेलमधील क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला रुग्णावर एका पुरूष रुग्णानं बलात्कार केला. यावरून महिला कुठेही सुरक्षित नाहीत हे सिद्ध झालं आहे. अशा बलात्कार्‍याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत ही पहिली शिक्षा. त्यातूनही तो वाचलाच तर त्याला भर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी. बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाही, असं शालिनी ठाकरे म्हणाल्या.
यापूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील संताप व्यक्त करत सरकारला सवाल केले होते. पनवेल क्वारंटाइन सेंटरमध्ये महिलेवर झालेला बलात्कार हा करोनापेक्षाही भयानक आहे. यापूर्वीही अशा सेंटरमध्ये महिलांसोबत लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या क्वारंटाइन कक्षाकडे पुरुष रुग्ण पोहचतातचं कसे ? सुरक्षा यंत्रणा, प्रशासन काय करत असते ?, असे सवाल चित्रा वाघ यांनी केले होते. या घटनेतील आरोपीला अटक झाली आहे. पण त्यासोबत क्वांरटाइनसेंटरच्या सुरक्षेसाठी असलेले सुरक्षारक्षक, तिथले प्रशासनही तेव्हढेचं जबाबदार आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या भगिनीही सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षेसाठीच्या ‘दिशा कायद्या’चं काय झालं की ती फक्त घोषणा होती, अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली आहे.
बलात्काराची ही घटना गुरुवारी रात्री घडली. यातील आरोपी आणि पीडिता या दोघांनाही करोनाचा संसर्ग झाल्यानं उपचारासाठी पनवेलजवळ असलेल्या इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. क्वारंटाइन सेंटरमध्येच हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील करोनाबाधित आणि करोना संशयितांना दाखल करण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *