शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, आंदोलकांनी दिल्ली जयपूर हायवे केला बंद

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन चिघळलं आहे. आंदोलकांनी आपला मोर्चा आता दुसऱ्या ठिकाणांवर केंद्रीत केला असून राजस्थानातल्या शाहजहांपूर इथं हरियाणा सीमेजवळ शेतकऱ्यांनी हायवे बंद केला आहे. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून सरकार त्यासाठी तयार नाही. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

गेल्या 18 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून सरकार आणि आंदोलक संघटनांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही. सरकार नव्या कायद्यांमध्ये दुरूस्त्या करण्यास तयार आहे. मात्र आंदोलक त्यासाठी तयार नाहीत त्यामुळे आंदोलन चिघळलं आहे.

पंजाब सीमेवर आधीच त्यांनी एक महामार्ग रोखून धरला आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे शेतकरी संघटनांशी चर्चा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र कोंडी फुटली नाही. दरम्य शहा यांनी पंजाबमधल्या भाजपच्या नेत्यांची आंदोलन आणि राज्यातल्या परिस्थितीबाबत आज चर्चा केली.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधल्या कारागृहांचे DIG लक्षमिंदर सिंह जाखड यांनी राजिनामा दिला आहे. आता आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *