चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक , केंद्र सरकार अखेर नरमलं

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा थेट परिणाम दिल्ली आणि आजूबाजूच्या जनजीवनावर झाल्याचं दिसून येतंय. शेतकऱ्यांचा हा पवित्रा लक्षात घेऊन केंद्र सरकार अखेर नरमलं आहे. सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी जी जागा निर्धारित केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पोहचावं, त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शेतकरी त्या ठिकाणी पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करेल.

दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या पंजाब व हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलीसांनी दिल्लीच्या सीमेवरच रोखलं आहे. गेल्या चार दिवसांपासून शेतकरी आहे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्लीच्या बुरारी मैदानावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन करावं असं सरकारनं प्रस्ताव ठेवला होता. परंतु शेतकऱ्यांनी तो धुडकावला आणि रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.

शेतकऱ्यांचा हा पवित्रा पाहून केंद्र सरकारनं आता एक पाऊल मागं घेत शेतकऱ्यांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यासाठी सरकारने निर्धारित केलेल्या बुरारी मैदानावर शेतकऱ्यांनी पोहचावं, तिथं त्यांची सर्व सोय केली जाईल असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला सरकारने 3 डिसेंबर रोजी आमंत्रित केलं आहे. याआधीही 13 नोव्हेंबर रोजी अशा प्रकारची चर्चा करण्यात आली होती. त्या चर्चेत केंद्रीय कृषीमंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सहभागी झाले होते.”

अमित शाह पुढे म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कडाक्याची थंडी पडल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचसोबत महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी बुरारी येथील मैदानात आंदोलन करावं. सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे.”

सरकारने त्या ठिकाणी पाणी, शौचालय आणि इतरही व्यवस्था केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. त्या ठिकाणच्या आंदोलनाला पोलीसांकडूनही परवाणगी देण्यात येईल. मी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना आश्वासन देतो की ते बुरारी मैदानात पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सरकार त्यांच्याशी चर्चा करेल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *