नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार

ताज्या घडामोडी मुंबई

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. करोनाचा कहर वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे.

नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर होता. तर दुसरीकडे निर्बंध, करोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र, ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम होतं.गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला करोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावला. त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोर पेच निर्माण झाला. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे सद्य:स्थितीत शक्य नाही. विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता.गेल्या वर्षीही नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी काही शाळांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुत्तीर्ण केले. जे विद्यार्थी अंतर्गत परीक्षा देऊ शकले नव्हते त्यांनाही या निर्णयाचा फटका बसला. त्याचप्रमाणे शुल्क भरले नाही म्हणून शाळा अनुत्तीर्ण करत असल्याच्या तक्रारीही विभागाकडे आल्या होत्या.

अकरावीचे शैक्षणिक वर्ष आताच सुरू
अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन वर्गात अद्याप पन्नास ते साठ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याची मुभा द्यावी, असे मत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी व्यक्त केलं होतं.

परीक्षा ऑफलाइन घ्यावी अशी ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी
महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या तरी या रोगाचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये कमी आहे. परंतु भविष्यात ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरी भागातून अनेक कामगार स्थलांतर करत आहेत. त्याबरोबर त्यांचे कुटुंबीय ग्रामीण भागात आपल्या गावी जात आहेत. यामुळे ग्रामीण भागात पुढील काळात कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणूनच वेळेवर परीक्षा व्हावी असा सूर काही लोक व्यक्त करत आहेत. आयसीआयसी, सीबीएससी व आयबी बोर्ड यांच्या परीक्षा मात्र वेळेवर होत आहेत, त्यामुळेच भविष्यात होणाऱ्या अनेक स्पर्धात्मक परीक्षेत राज्यातील मुले नक्कीच मागे पडणार. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असते व पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम या दृष्टीने राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.हाराष्ट्रातील अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उध्दभवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा आँफलाईन घ्यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *