डिसेंबरपर्यंत EPF वर मिळेल 8.50 टक्के व्याज; 6 कोटी लोकांना होणार फायदा

ताज्या घडामोडी देशविदेश

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ 2019-20 या आर्थिक वर्षात सहा कोटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात डिसेंबर अखेरपर्यंत 8.5 टक्के व्याज जमा करेल. यापूर्वी सप्टेंबरमध्ये कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ईपीएफओने व्याज 8.15 आणि 0.35 टक्क्यांच्या दोन हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला होता.

सुत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, कामगार मंत्रालयाने, अर्थ मंत्रालयाला 2019-20 साठी ईपीएफमध्ये एकावेळी 8.5 टक्के व्याज जमा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव याच महिन्यात पाठवण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयाकडून काही दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज जमा केलं जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अर्थ मंत्रालयाने, मागील आर्थिक वर्षाच्या व्याजदराबाबत स्पष्टीकरण मागितलं होतं. अर्थ मंत्रालयाला हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कामगार मंत्री गंगवार यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 2019-20 साठी ईपीएफओवर 8.5 टक्के व्याजदरास मंजुरी देण्यात आली होती.

मार्च महिन्यात केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यासोबतच मंडळाने 8.5 टक्के व्याज दोन हप्त्यांमध्ये 8.15 आणि 0.35 टक्क्यांनुसार कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिलं जाईल, असा निर्णय घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *