बोंडलेची डिसीसी बँक फोडली

सोलापूर

 माळशिरस : एकाच रात्रीत चोरट्यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची बोंडले शाखा व त्याच्या शेजारी असलेले मेडिकल फोडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास बोंडले (ता. माळशिरस) येथे घडली आहे. मात्र, रोख रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. या घटनेची माहिती मिळाताच अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली. 
रात्रभर सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फायदा घेऊन चोरट्यांकडून आज पहाटे पुणे-पंढरपूर पालखीमार्गालगत असलेल्या बोंडले येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेचे कुलूप तोडून व शेजारील गायत्री मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे शटर उसकटून फोडण्यात आले. चोरट्यांना बॅंकेचे प्रवेशद्वार व ग्रिलवरील कुलूप तोडून जरी बॅंक कार्यालयात प्रवेश करता आला असला तरी बॅंकेच्या लॉकरपर्यंत त्यांना जाण्यात अपयश आले. यामध्ये चोरट्यांनी बॅंकेतील कार्यालयातील दप्तर अस्ताव्यस्त करून इंनटरनेट डाटाबेस मशीन गायब केली आहे. तसेच गायत्री मेडिकलमध्ये कोणत्याही स्वरूपाची रोख रक्कम नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. यावेळी चोरट्यांकडून परिसरातील हायमास्ट दिवे व सीसीटीव्ही कनेक्‍शन तोडून बंद केले होते. सकाळी उठताच गावकऱ्यांना गायत्री मेडिकलचे शटर उसकटल्याचे व सफाई कामगाराला बॅंकेचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास येताच सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 
सदर घटनेची अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. यावेळी वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक जाधव, ठाणे अंमलदार अल्ताफ काझी, पोलिस सत्यवान पाटकूलकर, पोलिस पाटील पोपट वाघमारे, बॅंक शाखाधिकारी डी. पी. माने, लिपीक विजय कचरे, गायत्री मेडिकलचे महादेव जगताप आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *